‘एसटीपी’साठी एक्स्प्रेस फिडरचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 01:56 PM2020-01-31T13:56:39+5:302020-01-31T13:56:43+5:30
१ कोटी ३७ लक्ष रुपये किमतीची ५.२९ टक्के जादा दराने प्राप्त झालेली निविदा गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रिटमेंट प्लान्ट (एसटीपी) कार्यान्वित करण्याकरिता मनपा प्रशासनाने एक्स्प्रेस फिडरद्वारे उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करण्याच्या कामासाठी निविदा प्रकाशित केली होती. १ कोटी ३७ लक्ष रुपये किमतीची ५.२९ टक्के जादा दराने प्राप्त झालेली निविदा गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केली. सभापती विनोद मापारी यांनी सर्व सदस्यांनी होकार दिल्यानंतरच निविदेवर शिक्कामोर्तब केले.
‘अमृत’अभियान अंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोर्णा नदी पात्रात टाकलेल्या मलवाहिनीद्वारे शिलोडा येथे तयार करण्यात आलेल्या ‘सिवरेज ट्रिटमेंट प्लांट’ येथे सांडपाण्याची साठवणूक केली जाईल. शिलोडा येथे ३० एमएलडी प्लांटचे निर्माण करण्यात आले असून, या ठिकाणी घाण सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. उर्वरित ७ एमएलडी प्लांट पीडीकेव्हीच्या जागेत उभारण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान, शिलोडा येथे ‘एसटीपी’ कार्यान्वित करण्यासाठी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची गरज असून, त्यासाठी महावितरण कंपनीची परवानगी घेण्यात आली आहे. आपातापा येथून ‘ओव्हरहेड केबल’ टाकून शिलोडा येथे एक्स्प्रेस फिडर उभारण्यासाठी मनपाने १ कोटी ३० लक्ष २८ हजार रुपये किमतीची निविदा प्रकाशित केली होती. मनपाला प्राप्त झालेल्या निविदेत मे. कस्तुरी इलेक्ट्रिकल्स अॅन्ड इंजिनिअरिंग, यवतमाळ यांची निविदा उघडण्यात आली असता, कंपनीने ५.२९ टक्के जादा दराने निविदा सादर केल्याचे दिसून आले. या निविदेवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. यावेळी भाजप नगरसेवक हरीश काळे यांनी प्रशासनाकडून तांत्रिक बाबी समजून घेतल्या. मनपाचे मुख्य लेखाधिकारी मनजित गोरेगावकर, जलप्रदायचे कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे यांनी माहिती दिल्यानंतर सभापती विनोद मापारी यांनी निविदेला मंजुरी दिली. यावेळी २५ लाख रुपये किमतीपेक्षा अधिक विकास कामांना मंजुरी देण्यात आली.