सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:15+5:302021-01-21T04:18:15+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सस्ती शिवारातील रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने ...
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सस्ती शिवारातील रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने सिंचन रखडले आहे. विजेअभावी सिंचन रखडल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, शेतकरी चिंतित सापडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सस्ती वीज उपकेंद्रकडून रोहित्राची तपासणी न करता नादुरुस्त रोहित्र बसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच एका वर्षापूर्वी रोहित्र बसविले होते, ते रोहित्र जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत शेतकऱ्यांनी सस्ती वीज उपकेंद्रात धाव घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली; मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. वीज उपकेंद्राकडून नादुरुस्त रोहित्र बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सस्ती वीज उपकेंद्रकडे वारंवार रोहित्र दुरूस्त करण्याची मागणी केली; परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिसरात रब्बी हंगामात कांदा रोपाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सद्यस्थितीत पिकाला पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी पाणी देता येत नसल्याने कांद्याचे रोप सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित
खेट्री, शिरपूर परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नादुरुस्त रोहित्र बसविल्यामुळे अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. याकडे महावितरण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. -
-------------------------------
रोहित्र नादुरुस्त निघाल्याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविली आहे. रोहित्र प्राप्त झाल्यावर बदलण्यात येईल.
पी. ए. गुहे कनिष्ठ अभियंता वीज उपकेंद्र सस्ती