‘ऑपरेशन मुस्कान’ने ३६ मुलांचा शोध

By admin | Published: July 6, 2015 01:32 AM2015-07-06T01:32:18+5:302015-07-06T01:32:18+5:30

बेपत्ता, घर सोडलेल्या मुलांच्या शोधासाठी अकोला जिल्ह्यात ३६ कर्मचा-यांचा ताफा.

'Operation Smile' has 36 children's research | ‘ऑपरेशन मुस्कान’ने ३६ मुलांचा शोध

‘ऑपरेशन मुस्कान’ने ३६ मुलांचा शोध

Next

अकोला - आई-वडिलांच्या छत्रापासून दुरावलेल्या.. खेळण्या बागळण्याच्या वयात भिकेला लावलेल्या.. बेवारस म्हणून जीवन कंठीत असलेल्या.. आणि कोवळया वयातच चेहर्‍यावरील हास्य हरविलेल्या मुलांच्या चेहर्‍यावर स्मित फुलणार आहे. राज्याच्या गृह खात्यामार्फत यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत असून, जिल्हय़ात ३ दिवसांमध्येच या ऑपरेशनमुळे ३६ मुलांचा शोध घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हय़ातील ६ पोलीस अधिकार्‍यांसह ३६ कर्मचारी रात्रं-दिवस मुलांचा शोध घेत असून, त्याचेच फलित म्हणून बेवारस मुलांच्या चेहर्‍यावर ह्यमुस्कानह्ण फुलविण्याचे काम जिल्हय़ाच्या पोलीस खात्याने केले आहे.
राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आले असून, यामध्ये बेवारस, बेपत्ता, रागात घर सोडून गेलेल्या मुलांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना आई-वडील, नातेवाईक तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात १ ते ३१ जुलै या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.
या ऑपरेशनमध्ये बेपत्ता झालेले, हरवलेले, रागात घर सोडून गेलेल्या आणि बेवारस असलेल्या ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचा शोध घेण्यात येत असून, केवळ ३ दिवसांतच अकोला पोलीस दलाने ३६ मुलांचा शोध घेतला आहे. यापैकी २७ मुलांना आई-वडील व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, ९ मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या ३६ मुलांपैकी १३ मुलींचाही शोध ऑपरेशन मुस्कानमध्ये घेण्यात आला असून, ३ मुली बालकल्याण समितीच्या ताब्यात, तर उर्वरित १0 मुलींना त्यांचे आई-वडील व नातेवाईकांकडे सोपविण्यात अकोला पोलीस विभागाला यश आले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या ऑपरेशनचा रोजचा अहवाल घेण्यात येत असून, तो पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात येत आहे.
या पथकातील कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षक मीणा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील रोज सायंकाळी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळेच हे अभियान जिल्हय़ात बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहे.

Web Title: 'Operation Smile' has 36 children's research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.