‘स्थायी’च्या मुद्यावर विरोधक एकवटले!
By admin | Published: March 11, 2016 03:03 AM2016-03-11T03:03:40+5:302016-03-11T03:03:40+5:30
अकोला महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदासाठी सत्ताधा-यांसह आता विरोधकांनी देखील कंबर कसली.
अकोला: महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदासाठी सत्ताधार्यांसह आता विरोधकांनी देखील कंबर कसली आहे. सभापती पद कोणाच्याही वाटेला गेले तरी एकसंध राहण्याची भूमिका गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिप-बमसंच्या गटनेत्यांनी घेतली. ११ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केला जाणार असून, यावेळी काँग्रेससह भारिप-बमसंच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यावर निर्णय घेण्यात आला.
सभापती पदासाठी भाजपकडून दावेदारी केली जात असतानाच आता विरोधी पक्षांनी एकत्र येत सभापती पदावर दावा केला आहे. याविषयावर विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या दालनात गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बमसंचे गटनेता आणि नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, दिलीप देशमुख, राकाँचे गटनेता राजू मुलचंदानी, भारिपचे गटनेता गजानन गवई, रामा तायडे, बबलू जगताप आदी उपस्थित होते.