सत्तेत असताना विरोधकांनी तिजोर्यांचे सिंचन केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:53 AM2017-12-18T01:53:24+5:302017-12-18T01:54:40+5:30
नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्यांचे सिंचन केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्यांचे सिंचन केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह नऊ सिंचन प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या ११ कामांचा तसेच अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला.
गांधीग्राम येथे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २0 हजार कोटींची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीन गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला. म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणार्या कालावधीत या निधीचा पूर्ण विनियोग करून, सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतकर्यांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती, त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ. हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
आभाळ फाटल्याची बोंब!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदुरा येथील कार्यक्रमात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आज आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहे. जिगाव प्रकल्पाला विलंब करुन पूर्वीच्या सरकारमधील अनेकांनी आपलं चांगभलं केलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही : गडकरी
सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी दिले जाईल. त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणार्या काळात सिंचन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे, तर जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाईल. त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल, असा दावा त्यांनी केला.
कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५00 कोटी
काँग्रेसने सन २00८ मध्ये दिलेली कर्जमाफी ही केवळ सहा हजार कोटींची होती व त्यामध्ये विदर्भाला फक्त १५00 कोटी मिळाले. मात्र, भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये विदर्भातील शेतकर्यांना तब्बल ७ हजार ५00 कोटी दिले आहेत. शेवटच्या शेतकर्यांचे कर्ज माफ होईपयर्ंत ही योजना सुरू राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.