सराफा व्यापार वाढण्याची संधी - रोहन शहा
By admin | Published: June 22, 2017 04:44 AM2017-06-22T04:44:40+5:302017-06-22T04:44:40+5:30
‘जीएसटी’वर मंथन : पश्चिम विदर्भ विभागीय ‘जीजेएफ’चा सेमिनार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जीएसटीमुळे सराफा व्यापारात वाढ होण्याची संधी असून या संधीचे स्वागत संपूर्ण सराफा व्यावसायिकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन जीएसटी कौन्सिलचे सदस्य व विषयतज्ज्ञ रोहन शहा यांनी केले. ऑल इंडिया जेम्स अँण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन (जीजेएफ)तर्फे आयोजित पश्चिम विदर्भ विभागीय सेमिनारमध्ये ते बोलत होते.
स्थानिक सिटी स्पोर्ट क्लब येथे बुधवारी दिवसभर चाललेल्या या सेमिनारला रोहन शहा, जीजेएफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन खंडेलवाल, शांतीलाल पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम अकोला सराफा असोसिएशनचे शहर अध्यक्ष विजय वाखारकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागत समारंभानंतर सेमिनारला सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील नागरिक सोने इन्व्हेसमेंटकरिता खरेदी करतात, ते लक्झरी म्हणून नाही, हे पटवून द्यावे लागले. त्यानंतर सरकार पाच टक्के साधारण टॅक्ससाठी तयार झाले. व्हॅल्यू अँडेट टॅक्सबाबतही त्यांनी येथे मार्गदर्शन केले.
सराफांच्या फायलिंगसाठी जीएसटी अलर्ट सॉफ्टवेअर !
सीए भाविन मेहता यांनी सराफा व्यावसायिकांच्या दृष्टीने चौदा स्टेपचे फायलिंग सुलभ आणि सोपे व्हावे म्हणून विशिष्ट प्रकारचे जीएसटी अलर्ट सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आल्याची माहिती दिली. व्हेरिफिकेशन करण्याएवढय़ा प्रत्येक महिन्याच्या १0, १५ आणि २0 तारखांचे फायलिंग झाले, की पुढे प्रत्येक फायलिंगच्या वेळी हे सॉफ्टवेअर अलर्ट मॅसेज देईल. सराफा व्यवसायाच्या दृष्टीने अनिल नाचर आणि सुजरिता मुखर्जी यांनी अधिगमद्वारा हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेऊन सप्लाय, जमा-खर्चाची नोंद व्यावसायिकांनी खात्यात घ्यावी, असे आवाहनही येथे करण्यात आले.
जीएसटी अंमलबजावणीच्या लाभम सेमिनारचा लाभ शेकडो सराफा आणि सुवर्णकारांनी घेतला. अकोला, वाशिम, बुलडाणा येथील शेकडो व्यावसायिक या सेमिनारला प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला सराफा असोसिएशन अकोला, सुवर्णकार आणि सराफा युवा संघ, अकोला जिल्हा सराफा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पालन आणि उत्कृष्ट व्यवसाय प्रणालीसाठी हे सेमिनार घेण्यात आले.
२0१७-१८ च्या अर्थ संकल्पाची भविष्यातील गुरुकिल्ली, जीएसटी कायदा त्याबाबत तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर, फायनान्स, बँकिंग, टॅक्सेशनशी संबंधित खात्यांची नोंद, स्टॅन्डरायजेशन आणि सर्टिफिकेशन यांची माहिती दिली. हिंदी आणि इंग्रजीत तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर सुलभ आणि सोपे कसे आहे, याची माहिती पॉवर पॉइंट प्रोजेक्टवर देण्यात आली. त्यासाठी सराफा व्यावसायिकांनी जीएसटीची नोंदणी २५ जूननंतर करणे गरजेचे आहे. एकूण १४ स्टेजमध्ये जीएसटीची करावयाच्या फायलिंगची भीती बिलकुल बाळगू नका, एकदा क्रेडिट मिळण्याची प्रक्रिया लक्षात आली, की पुढे सोपे होईल, असेही सांगितले. तसेच उपस्थित असलेल्या व्यावसायिकांच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी देऊन अनेकांच्या समस्यांचे निराकरण केले.
अकोल्याचे सीए प्रशांत लोहिया यांनी जीएसटीचे फायदे-तोटे सांगितले. जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकाचे भारतातील प्रतिनिधी अमित पटेल यांनी डायमंडसंबंधी माहिती दिली. नितीन केडिया यांनी एमसीएक्समधील ट्रेड इन्श्यूरन्ससंदर्भात येथे माहिती दिली. अजय केदार यांनी बाजारपेठेतील धोक्यावर लक्ष वेधले. अहमदाबाद येथील शांतीकाका पटेल, संजय जैन, संजय अग्रवाल, रवी खंडेलवाल, जीजेएफचे सीईओ मुकुल कुलकर्णी, राजेश पटवारी प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता करकरे यांनी तर आभार प्रशांत झांबड यांनी मानले. सराफा असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.