विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना कृती संशोधनाची संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:34 PM2018-11-30T13:34:08+5:302018-11-30T13:34:12+5:30
शिक्षकांना कृतिशील बनविण्यासाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कृती संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकोला: शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग निरनिराळे प्रयोग करीत आहे. शिक्षकांना कृतिशील बनविण्यासाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कृती संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात फायदा होईल. त्यासाठी केलेले प्रयोग, शिकविण्याची आगळी-वेगळी पद्धत विकसित केली असेल, अशा शिक्षकांना २0१८-१९ साठी कृती संशोधन सादर करण्याची संधी आहे.
राज्यातील शैक्षणिक गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना अध्ययन करताना येणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन त्यावर उपाययोजात्मक कार्यपद्धती तयार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक शिक्षक प्रयत्न करतात. त्यांना चालना देण्यासाठी दरवर्षी राज्य स्तरावरून कृती संशोधने हाती घेतली जातात. यंदा २0१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही कृतिशील प्रयोग, काही वेगळे संशोधन केले असेल, तर निवडक शिक्षकांना त्यांचे कृती संशोधन मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या कृती संशोधनाचा आदर्श पुरस्कारासाठी फायदा होणार आहे. त्यासाठी शिक्षकांच्या कृती संशोधनाला गुण दिले जाणार आहेत. कृती संशोधनाची आवड असणाºया प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना १६ डिसेंबरपर्यंत एका लिंकमध्ये माहिती सादर करावी लागणार आहे. शिक्षकांनी एचटीटीपीएस://डब्लूडब्लूडब्लू.रिसर्च.नेट/आर/अॅक्शनरिसर्च२0१८-१८ यावर माहिती सादर करावी. (प्रतिनिधी)