मूर्तिजापूर ‘सीओ’च्या विरोधात हक्कभंग, आ. बाजोरिया आक्रमक; घरकुल योजना, घुंगशी बॅरेज प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 09:48 AM2018-02-07T09:48:31+5:302018-02-07T09:48:49+5:30
अकोला : एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा पात्र लाभार्थींना नऊ वर्षांपासून ताबाच मिळाला नाही. ७३२ पेक्षा जास्त लाभार्थी योजनेपासून उपेक्षित आहेत. घरकुल योजनेसोबतच घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंतच्या पाइपलाइनची माहिती सादर न करणे मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या अंगलट आले असून, विधान परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी मुख्याधिकारी डोल्हारकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी मंगळवारी शासनाकडे सादर केली आहे.
एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे १ हजार ७ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. २00८-0९ पासून सदर घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये अनुदान मंजूर केले होते. त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थींना १२ ते १५ हजार रुपये लाभार्थी हिस्सा जमा करणे भाग होते. कालांतराने अनुदानात २५ हजार व नंतर पुन्हा ७५ हजार रुपये वाढ केल्यामुळे एका घरकुलासाठी दोन लाखांचे अनुदान देण्यात आले. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी नगर परिषद प्रशासनाकडे ज्या लाभार्थींनी आर्थिक हिस्सा जमा केला, त्या ३५0 लाभार्थींपैकी २७५ लाभार्थींंना घरकुलांचा ताबा देण्यात आला. उर्वरित ७३२ लाभार्थींना घरकुलांचा ताबा दिलाच नाही. १३ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घरकुलांचे वाटप करण्याचे मुख्याधिकार्यांना स्पष्ट निर्देश होते. घरकुल योजनेसंदर्भात आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना वारंवार विचारणा केल्यावरही ते थातूरमातूर उत्तरे देत असल्याचे दिसून आले.
घुंगशी बॅरेज, पाइपलाइनची माहिती नाही!
घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंंतच्या पाइपलाइनच्या कामाची माहिती मागितली असता मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी माहितीच उपलब्ध केली नसल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी पत्रात नमूद केला आहे. ५ फेब्रुवारी रोजी घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंंत पाइपलाइन टाकण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रण न देणार्या मुख्याधिकार्यांनी अवमान केल्याचे नमूद करीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र विधान परिषद नियम २४0 अन्वये हक्कभंगाची सूचना दाखल करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी केली आहे.