उपमहापौरांसह विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल
By admin | Published: May 5, 2016 02:40 AM2016-05-05T02:40:07+5:302016-05-05T03:11:08+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात मित्रपक्ष शिवसेनेनेच तलवार उपसल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.
अकोला: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात मित्रपक्ष शिवसेनेनेच तलवार उपसल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. सभेची टिप्पणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सभा सुरू न करण्याचा पवित्रा सेनेचे उपमहापौर विनोद मापारी यांनी घेतला. उपमहापौरांच्या भूमिकेला विरोधकांनी दाद दिल्याने सभागृहातील गोंधळ वाढत गेल्याचे पाहून महापौर उज्ज्वला देशमुख यांनी ३0 मिनिटांसाठी सभा स्थगित केली. यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू होताच, अवघ्या दहा मिनिटांत विषयांना मंजुरी देऊन महापौरांनी सभा गुंडाळली.
मनपाच्या मुख्य सभागृहात स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी भारिप-बमसंच्या नगरसेविका अरुंधती शिरसाट यांनी सभागृहात महिला नगरसेविकांचा अपमान होईल असे शब्दप्रयोग पुरुष नगरसेवकांनी टाळावेत, अशी मागणी केली. न पटणार्या विषयांना विरोध करण्याची भाषा सौम्य असावी, अशी सूचना त्यांनी केली. या सूचनेला सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार यांनी अनुमोदन दिले.
यादरम्यान अचानक शिवसेनेचे उपमहापौर विनोद मापारी यांनी विषयपत्रिकेची टिप्पणी अद्यापही न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करीत, जोपर्यंत टिप्पणी मिळत नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज सुरू न ठेवण्याची भूमिका मांडली. उपमहापौरांच्या दिमतीला तातडीने विरोधी पक्षनेता साजिद खान, भारिपचे गटनेता गजानन गवई धावून आले. सत्तेत मित्रपक्ष म्हणून शिवसेना असली तरी ३0 एप्रिल रोजी आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बैठकीचे निमंत्रण सेनेला नसल्याचा विषय विनोद मापारी यांनी उकरून काढला. यावर ही बैठक केवळ भाजप लोकप्रतिनिधींची असल्याने निमंत्रणाचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सभापती विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.