महापालिका हद्दवाढीला विरोध !
By admin | Published: March 10, 2016 02:32 AM2016-03-10T02:32:54+5:302016-03-10T02:32:54+5:30
अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर; शासनाकडे पाठविणार
अकोला: शहरातील समस्या लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला तीव्र विरोध करीत, आधी शहराचा विकास करण्यात यावा, नंतरच शहराजवळील गावांचा शहरात समावेश करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. स्थायी समितीचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती , पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावित मनपा हद्दवाढीला विरोध करीत, हद्दवाढीच्या विषयावर किमान एक वर्षानंतर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्य विजय लव्हाळे यांनी सभेत केली, तसेच मनपा हद्दवाढीस विरोध नाही; मात्र आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतरच हद्दवाढ करून शहराजवळील गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्याची मागणी सदस्य दामोदर जगताप यांनी केली. मनपाच्या प्रस्तावित हद्दवाढमध्ये अकोला शहराजवळील २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश होणार आहे; मात्र शहराची सध्या अवस्था बघता, पिण्याचे पाणी, रस्ते, प्रदूषण अशा अनेक समस्या आहेत. शहरातील समस्या काढून, आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतर हद्दवाढ करून गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली.
मनपा हद्दवाढीस सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने, यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. आधी शहराचा विकास करा, नंतरच हद्दवाढ करण्यात यावी, असा मंजूर करण्यात आलेला ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितले.