अभाविप करणार आज शिक्षणमंत्र्यांविरोधात निदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:28 AM2017-12-11T02:28:43+5:302017-12-11T02:29:29+5:30
भाजप सरकार विरुद्ध विरोधी पक्ष मैदानात उतरले असताना, आता संघ परिवारातील महत्त्वाची संघटना असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसुद्धा भाजप सरकारविरोधात उभी ठाकली आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रियेबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप करीत, अभाविपने भाजपला घरचा अहेर दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजप सरकार विरुद्ध विरोधी पक्ष मैदानात उतरले असताना, आता संघ परिवारातील महत्त्वाची संघटना असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसुद्धा भाजप सरकारविरोधात उभी ठाकली आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रियेबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप करीत, अभाविपने भाजपला घरचा अहेर दिला आहे. शासनातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरुद्ध अभाविपने राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ११ डिसेंबर रोजी निदर्शने करणार आहे.
अभाविप ही अप्रत्यक्षरीत्या भाजपाप्रणित विद्यार्थी संघटना असल्याचे नेहमीच म्हटल्या जाते. अभाविपचे अनेक नेते भाजपात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या विरोधी पक्ष भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शेतकरी, जनतेमध्ये भाजप सरकारविषयी नाराजी असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. त्यात शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शासन उदासीन असल्याचे म्हणत, संघ परिवाराशी संबंधित अभाविपने नाराजी व्यक्त केली. अभाविपने भाजपविरोधी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धतीने, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रिया आदींबाबत शासन उदासीन दिसून येत आहे. अभाविपने यासंदर्भात वेळोवेळी निवेदनातून शासनाला कळविले होते; परंतु शासनाने त्याची दखलसुद्धा घेतली नाही. एकंदरितच भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर अभाविपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. छात्रसंघ निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्या. सेमिस्टर पॅटर्न बंद करावा, विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती द्यावी, एक खिडकी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी अभाविप ११ डिसेंबर रोजी विदर्भातील सर्वच जिल्हय़ांमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करणार आहेत, अशी माहिती अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री विक्रमजित कलाने, महानगरमंत्री वशिष्ठ कात्रे, हर्षल अलकरी यांनी दिली.