अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:48 PM2019-06-04T14:48:55+5:302019-06-04T14:49:07+5:30
प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था यांनी २७ मे रोजी दिला आहे.
अकोला -सहकारी संस्थेच्या तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी एकाच कुटुंबातील चार जणांना अवैध सावकारी प्रकरणात निर्दोष सोडले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था यांनी २७ मे रोजी दिला आहे. त्यामुळे अनुप डोडिया व त्यांच्या कुटुंबातील चार जणांची अवैध सावकारी प्रकरणात पुन्हा तालुका उपनिबंधक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
रतनलाल प्लॉट चौकातील रहिवासी अनूप डोडिया त्यांचे वडील निरंजन डोडिया, आशिष डोडिया व प्रियंका डोडिया या चार जणांना २३ मे २०१७ रोजी सहकारी संस्थेच्या तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी अवैध सावकारी प्रकरणात चौकशी करून निर्दोष सोडले होते. फुपाटे यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना निर्दोष असल्याचा अहवाल जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठवीला होता. या विरोधात तक्रारकर्ते मनीष देशमुख यांनी पुणे येथील सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार करून अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर सहकार आयुक्त पुणे यांनी मनीष देशमुख व डोडिया कुटुंबीय यांचे बयाण नोंदविल्यानंतर याप्रकरणी सुरेखा फुपाटे यांनी डोडिया कुटुंबीयांना निर्दोष सोडल्याचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करीत या अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. तालुका उपनिबंधक या प्रकरणाची पुन्हा चौकशी करतील, असेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे डोडिया कुटुंबीय यांना निर्दोष सोडणाऱ्या सुरेखा फुपाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचीही तक्रार मनीष देशमुख यांनी केली आहे. तालुका उपनिबंधक यांनी दिलेला २०१७ चा आदेश रद्द कायद्यानुसार नसल्यामुळे या अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था जोगदंड यांनी दिला आहे.