विद्यापीठ अभियंत्यावर कारवाईचे आदेश
By admin | Published: August 22, 2015 01:02 AM2015-08-22T01:02:48+5:302015-08-22T01:02:48+5:30
लोकमतच्या वृत्ताची दखल; गोपी ठाकरे यांची वसतिगृहाला भेट.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून अंधारात राहत असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी शिवनेरी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधितांना प्रकरणाची विचारणा करत विद्यापीठाचे मुख्य अभियंता रोडगे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहात मंगळवार ४ ऑगस्टपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना तब्बल पंधरा दिवस अंधारात काढावे लागल्याचे वृत्त शुक्रवारी लोकमतने प्रकाशित केले. वृत्त पाहताच कृषी विद्यापीठातील वसतिगृह प्रमुखांनी वसतिगृहाची तपासणी केली. दुपारच्या दरम्यान विद्यापीठ कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी वसतिगृहाला भेट दिली. दरम्यान, त्यांनी वसतिगृह प्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचार्यांना या प्रकरणी खरीखोटी सुनावली. यावेळी विद्यापीठाचे अभियंता रोडगे यांच्याबद्दल विचारण्यात आले असता ते सुट्टीवर असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या नंतर त्यांनी वसतिगृहात देण्यात येणार्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांंसोबत समस्यांबाबत चर्चा केली असता विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार सांगितला. या चर्चेदरम्यान विद्यापीठातील रोहित्रामध्ये बिघाड असून, याकडे विद्यापीठ अभियंत्यांनी लक्ष दिले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. तसेच वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिकार्यांना दिले. एकंदरीत लोकमतच्या वृत्ताची दखल घेत शिवनेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्या निकाली लावून विद्यार्थ्यांंना न्याय मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.