लॅपटॉपसाठी ऑनलाइन ऑर्डर केली, अडीच लाख पाठवूनही प्रतिसाद नाही; सायबर पोलिस आले धावून
By नितिन गव्हाळे | Published: August 22, 2023 06:34 PM2023-08-22T18:34:21+5:302023-08-22T18:34:38+5:30
स्वस्तात लॅपटॉप, संगणक मिळत असलेल्या जाहिरातीच्या भूलधापांना बळी पडून अकोल्यातील एका व्यावसायिकाची अडीच लाख रूपयांनी ऑनलाईन फसवणूक केली होती.
अकोला : स्वस्तात लॅपटॉप, संगणक मिळत असलेल्या जाहिरातीच्या भूलधापांना बळी पडून अकोल्यातील एका व्यावसायिकाची अडीच लाख रूपयांनी ऑनलाईन फसवणूक केली होती. तक्रारदार व्यावसायिकाने वेळीच सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने पोलिसांनी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला त्याची २ लाख ६१ हजार रूपयांची रक्कम परत मिळवून दिली.
अकोला येथील खदान परिसरात राहणारे मुकेश वलेच्या यांचे संगणक विक्री व दुरुस्तीचे ‘सोनी कम्प्युटर’ नावाने दुकान आहे. त्यांच्या एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर कॉम्प्युटर व लॅपटॉप कमी भावात मिळत असल्याबाबत जाहिरातीचा मॅसेज आला. कमी किमतीत मिळणार म्हणून तक्रारदार वलेच्या यांनी जाहिरातीच्या माध्यमातून काही कॉम्प्युटर, लॅपटॉप, लॅपटॉप बॅग अशा साहित्यांची ऑनलाईन ऑर्डर केली. त्याप्रमाणे ऑर्डर केलेल्या साहित्याची एकूण रक्कम दोन लाख ६१ हजार ४०० रुपये त्यांनी संबधिताच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम पाठवली. त्यानंतर ऑनलाईन ऑर्डर केलेले साहित्य प्राप्त न झाल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या ऑनलाईन ऑर्डर बाबत विचारणा केली. संबंधीत जाहितीवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क केला.
परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदार यांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ऑनलाईन फसवणुकीबाबत खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार खदान पोलिसांनी सायबर पोलिसांकडे पाठविली. सायबर पोलिसांनी तक्रारदाराकडून ऑनलाइन व्यवहाराबाबत तत्काळ माहिती घेवून संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून व्यावसायिकाचे खाते गोठविले. संबंधित खात्यांमध्ये वेगवेगळी रक्कम गोठवण्यात आली. तक्रादार यांची ऑनलाईन फसवणूक झालेली सूपंर्ण रक्कम दोन लाख ६१ हजार ४०० रुपये परत तक्रारदारास मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नाफडे, पोलिस अंमलदार गजानन केदारे, अतुल अजने यांनी केली.
नागरिकांनी आपल्या बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा एटीएम कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, अथवा ॲप्लीकेशन डाउनलोड करू नये, ओ.एल.एक्स सारख्या ॲप्सवरून अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना शहानिशा करून आर्थिक व्यवहार करावा. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक