‘टीईटी’ उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:34 PM2018-08-18T13:34:03+5:302018-08-18T13:38:43+5:30
टीईटी उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिला आहे.
अकोला : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांनाशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी ‘टीईटी’ परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु शेकडो शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिला आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे २0१३ मध्ये बंधनकारक केले होते. १३ फेब्रुवारी २0१३ नंतर खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या; परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या, परीक्षा न दिलेल्या शिक्षकांना २0१६ च्या शासन निर्णयानुसार प्रथम तीन संधीनुसार परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु त्यानंतरही राज्यातील हजारो शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. खासगी शिक्षण संस्था, अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक शाळांमधील हजारो शिक्षकांनी टीईटी परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाने गणना करावी आणि त्यांची संख्या निश्चित करण्यात यावी, त्यानुसार त्यांच्या शाळांना ही माहिती देण्यात यावी आणि त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, त्यासंबंधीचा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करण्याचा आदेशही शिक्षण सहसंचालकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
अकोला जिल्ह्यात २0१३ नंतर खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी नवीन मंजुरी देण्यात आली नाही; परंतु शिक्षण विभागामार्फत शोध घेऊन कोणी असा शिक्षक आहे का, तीन संधीनंतरही त्यांनी टीईटी उत्तीर्ण केलेली नाही. याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी,
प्राथमिक, जि.प. अकोला.