देशातील कृषी अधिकाऱ्यांना अकोल्यात सेंद्रिय शेतीचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:53 PM2018-09-26T12:53:22+5:302018-09-26T12:55:07+5:30
सेंद्रिय शेतीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, येथे पाच राज्यांतील वरिष्ठ कृषी अधिकाºयांना राष्टÑीय स्तरावरील सेंद्रिय शेतीचे मॉडेल प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अकोला : विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची गरज असल्याने केंद्र शासनाने यावर भर दिला आहे. याच अनुषंगाने सेंद्रिय शेतीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, येथे पाच राज्यांतील वरिष्ठ कृषी अधिकाºयांना राष्टÑीय स्तरावरील सेंद्रिय शेतीचे मॉडेल प्रशिक्षण देण्यात येत आहे.
भारत सरकार, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्या विभाग तसेच विस्तार शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अल्पभूधारक शेतक ºयांसाठी शाश्वत शेती तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल प्रशिक्षण २४ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरपर्यंत १० दिवस या ठिकाणी दिले जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण वर्गासाठी देशातील पाच राज्यांतून एकूण २० कृषी विस्तार अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित झाले असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी यांनी जवळपास ३६ तासिकांचे प्रात्यक्षिकासह शिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य निर्माण करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी हरितक्रांतीचा जागर झाला. जमिनीच्या पोतानुसार कोणते पीक घ्यावे, खताच्या मात्रा कशा व कधी द्याव्या, यासह कीड व रोगांच्या उपद्रवाच्या स्थितीनुसार औषधांची फवारणी आदीसह एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड रोग नियंत्रण तंत्रज्ञानसुद्धा सर्वदूर प्रसारित झाले आहे. तरीही आज आपण विषमुक्त अन्न, फळे, हवा, पाणी आदीसाठी भटकत आहोत. नवीन पिढीसाठी काही चांगले करायचे असेल, तर विषमुक्त अन्नधान्य निर्मितीसह गावपातळीवरील प्रक्रिया तंत्र अंगीकारणे आवश्यक आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ डॉ. दिलीप मानकर, डॉ.बी.व्ही सावजी, डॉ. आदिनाथ पसलावार, सेंद्रिय तज्ज्ञ डॉ. विनोद खडसे, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. नीरज सातपुते, डॉ. डी. व्ही. माळी, डॉ. एस. के. बलकारे, डॉ. योगेश इंगळे, डॉ. किशोर बिडवे, परीक्षित शिंगरूप, संदीप बोंद्रे, अमोल हरणे, परिहार, आरती गभणे, नेहा काळे, अदिती देशमुख, ईश्वर बोबडे, दिनेश चºहाटे, लोमेश मोहुरले, दुर्गा तायडे आदींची उपस्थिती होती.