सेंद्रिय शेतीला प्रत्यक्ष कृतीतून चालना !
By admin | Published: July 6, 2014 07:52 PM2014-07-06T19:52:42+5:302014-07-07T00:48:50+5:30
६८ शेतकर्यांनी घेतली सेंद्रिय शेती पदविका , दज्रेदार पिके, पदार्थांंची निर्मिती
अकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ शेतकर्यांनी येथून सेंद्रिय शेती प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका) प्राप्त केले असून, त्यांनी दज्रेदार सेंद्रिय पिके व पदार्थ निर्मितीला सुरुवात केली आहे.
पीक पद्धतीमध्ये वेगवेगळी रसायनं, कीटकनाशकांचा वाढता वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवर शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनांचा वापर वाढतच आहे. या पृष्ठभूमिवर शेतकर्यांना प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून त्यांच्यात याविषयी आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्यांनी सेंद्रिय पिकं घेणे सुरू केले असून, त्यावर आधारित उद्योगही सुरू केले आहेत.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरही भर देण्यात येत आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या नागपूर विभागीय सेंद्रिय शेती केंद्राच्यावतीने विदर्भातील शेतकर्यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच केले होते. सेंद्रिय उत्पादनांना उपलब्ध असलेली आंतराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादनांना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले आहे; मात्र या शेतीचा प्रसार गतीने होण्यासाठी, शेतकर्यांना प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठीच सेंद्रिय शेतीवर नव्याने भर देण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेणारी तिसरी तुकडी बाहेर पडली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विदर्भात प्रशिक्षित शेतकरी तयार केले जात आहेत. अकोला जिल्हय़ातील शेतकर्यांनी या माध्यमातून स्वत:चे उद्योगही सुरू केले आहेत. यात तेल्हारा तालुक्यातील काही महिला शेतकर्यांचाही समावेश आहे.