सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार!

By admin | Published: February 15, 2016 02:04 AM2016-02-15T02:04:45+5:302016-02-15T02:04:45+5:30

स्वीत्झर्लंड येथील वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. गुरबीर भुल्लर यांची खास ‘लोकमत’शी बातचीत.

Organic farming will save mankind now! | सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार!

सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला : सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार असल्याने जागतिक पातळीवर सेंद्रिय शेतीची चळवळ गतिमान होत आहे. भारतातही सेंद्रिय शेती विकासासाठी निश्‍चित कृषी धोरण आखण्याची गरज असल्याची माहिती सेंद्रिय शेती संशोधन संस्थेचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. गुरबीर एस. भुल्लर, स्वीत्झर्लंड यांनी खास लोकमतशी बातचीत करताना दिली.
डॉ. भुल्लर तुलनात्मक शेती पद्धती कार्यक्रम अधिकारीही असून, सेंद्रिय शेतीवर ते प्रामुख्याने काम करतात. डॉ.पंजाबराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते अकोला येथे आले असताना त्यांनी सेंद्रिय शेतीची गरज व उपाय यावर लोकमतशी खास बातचीत केली.

प्रश्न- सेंद्रिय शेतीची चळवळ भारतात गतिमान करण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर- हे बघा, सेंद्रिय पीक आरोग्यासाठी कसे पोषक आहे आणि रासायनिक पिकांचा आरोग्यावर कसा प्रतिकूल परिणाम होतो, हे विस्तार कार्यक्रमातून शेतकर्‍यांना समजावून सांगावे लागणार आहे.

प्रश्न- सेंद्रिय उत्पादनाच्या किमती अवाजवी असल्याने बाजारपेठेचा प्रश्न निर्माण होतो का?
कोण म्हणतो, सेंद्रिय शेती उत्पादनाची किंमत अवाजवी आहे. याचेच शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीचा तुलनात्मक अभ्यास मांडावा लागेल. आजमितीस आपण रासायनिक खते, कीटकनाशकेयुक्त अन्नधान्य खातो. त्यासोबत आपण विष सेवन करीत आहोत. सतत या विषाचे सेवन होत असल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. पर्यायाने वैद्यकीय खर्च वाढतो आहे. रासायनिक शेतीचा पर्यावरणावर दूषित परिणाम होत आहेत. हा सर्व खर्च बघितला तर सेंद्रिय उत्पादनाची किंमत रासायनिक पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सेंद्रिय उत्पादनाऐवजी आपणास रासायनिक उत्पादने स्वस्त वाटतात पण, त्यासोबत आपण किती मोठे आजार घरी नेत आहोत, हे लक्षात आणून देण्याची गरज आहे.

प्रश्न- पण, सेंद्रिय उत्पादने ओळखणार कसे?
अर्थात बोगस सेंद्रिय उत्पादने ओळखण्यासाठी गुणवत्ता व तपासणी केंद्र लागतीलच.

प्रश्न- सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी काय करावे लागेल?
रासायनिक व सेंद्रिय शेती उत्पादनातील फरक व खर्चाचा ताळेबंद शेतकर्‍यांना समजावून सांगावा लागेल, आणि किरकोळ बाजारात विकल्या जाणार्‍या मालाच्या किमतीवर शेतकर्‍यांची थेट भागीदारी असली पाहिजे. तद्वतच प्रत्येक अनुदान हे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करणे क्रमप्राप्त आहे.

प्रश्न - सेंद्रिय शेतीला नियमित बाजारपेठ कुठे आहे?
हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच निश्‍चित धोरण असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती उत्पादनांना नियमित बाजारपेठ उपलब्ध झाल्यास सेंद्रिय शेतीवर शेतकरी लक्ष केंद्रित करतील. तसेच शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय पदविका अभ्यासक्रम देशपातळीवर सुरू करणे तेवढेच आवश्यक आहे. तसेच स्वामीनाथन समितीच्या शिफारशी शासनाने आता अंमलात आणण्याची गरज आहे. संशोधकांनी बाहेर पडून शेतकर्‍यांना कोणते संशोधन हवे आहे, याची शेतकर्‍यांसोबत चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. शेतकर्‍यांची गरज बघून संशोधनाची दिशा ठरवणे, पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे.

प्रश्न- सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी तुमच्या काही योजना?
प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे गरजेचे असून, प्रत्येक धर्मगुरू ंनी आपल्या भक्तामध्ये प्रसार केल्यास त्याचे परिणाम जास्त प्रभावी ठरतील, कारण धर्मगुरू ंनी सांगितलेल्या विचारांचे भक्त तंतोतत पालन करतात, त्यामुळे परायणे, वारकरी आदींना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिल्यास सेंद्रिय शेतीचा प्रसार होईल.

प्रश्न- कृषीची प्रकाशने इंग्रजीत असतात?
धर्मगुरू किंवा शेतकर्‍यांमधील तज्ज्ञ शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी, कृषी विभागाने त्यांची प्रकाशने, शेती, संशोधन व नवतंत्रज्ञानाची माहिती पुस्तिका प्रादेशिक भाषेत प्रकाशित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले पण, ते सामान्य शेतकर्‍यांना समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि प्रकाशित कृषी साहित्य शेतीपुरक असले पाहिजे.

Web Title: Organic farming will save mankind now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.