‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिषदेचे आज आयोजन
By admin | Published: April 24, 2017 01:55 AM2017-04-24T01:55:40+5:302017-04-24T01:55:40+5:30
तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती : महिलांमधील कर्करोगनिदान, प्रतिबंध विषयावर होणार ऊहापोह
अकोला: ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटल यांच्या वतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२४) माहेश्वरी भवन, अकोला येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होणार असून, त्यात कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. इम्रान निसार शेख, डॉ. नवीता पुरोहित हे मार्गदर्शन करणार आहेत.
‘लोकमत’ने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या साथीने कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. कर्करोगाचे लवकरच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, हे समजावून या घातक आजाराबाबत लोकांच्या मनात रुजलेली भीती कमी करण्यसाठी याअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हा आजार कसा बरा झाला आणि रुग्ण सामान्य जीवन कसे जगू लागले, हे दाखविण्यासाठी कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तीचे अनुभव यात मांडले जाणार आहेत. याअंतर्गत पथनाट्य, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि राज्यभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबात जनजागृती करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यामुळे कर्करोग पूर्णत: नियंत्रणात आल्याची उदाहरणे आपल्यापुढे आहेत. त्यामुळे या आजाराची लक्षणे समजून घेऊन योग्य वेळेत त्याचे निदान करून घेणे, हाच कर्करोगाच्या विळख्यातून सुटण्याचा राजमार्ग आहे; मात्र ७० टक्के लोक याची माहिती घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. ‘आपल्याला कुठे हा आजार झाला आहे, मग कशाला घ्या त्याची माहिती!’ असा त्यांचा दृष्टिकोन असतो. उर्वरित ३० टक्के लोक उत्सुकतेने याबाबत सर्व माहिती घेतात; परंतु या आजाराची सर्वच लक्षणे त्यांना स्वत:मध्ये दिसत असल्याचे त्यांना भासते. त्यामुळे ते अक्षरश: हादरून जातात. ही वेळ येऊ नये यासाठी या आजाराची सविस्तर माहिती या परिषदेत देण्यात येणार आहे.
सखींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9922200063या क्रमांकावर संपर्क साधावा.