कृषी विद्यापीठाकडून फुलाचे दुसरे संकरित वाण विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:40 AM2018-05-30T06:40:53+5:302018-05-30T06:40:53+5:30
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘गोल्ड ग्लॅडीओलस’ ही संकरित फुलाची जात विकसित केली असून, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने या फुलाचे उत्पादन घेण्यासाठीची मान्यता दिली आहे.
अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘गोल्ड ग्लॅडीओलस’ ही संकरित फुलाची जात विकसित केली असून, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने या फुलाचे उत्पादन घेण्यासाठीची मान्यता दिली आहे.
बाजारात आकर्षक फुलांची मागणी प्रचंड वाढल्याने कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुधीर दलाल यांनी सोनेरी रंगाची आकर्षक ग्लॅडीओलस संकरीत फुलाची जात विकसित केली. याआधी रोशनी या नावाने ग्लॅडीओलस फुलाची जात विकसित करण्यात आली होती. ‘रोशनी’चा रंग गुलाबी पांढरा आहे. उत्पादनही हेक्टरी ५ लाख २०० फुलदांडे आहे. गोल्ड ग्लॅडीओलसचे उत्पादन हेक्टरी ४ लाख ८०० फुलदांडे आहे; पण ही जात आकर्षक सोनेरी असल्याने मागणी जास्त असल्याने या जातीवर संशोधन सुरू होते.
देशात फुलांची मागणी बघता, कृषी विद्यापीठांनी भरघोस उत्पादन देणाऱ्या संकरीत फुलांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला असून, यावर संशोधन सुरू आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने रोशनी, गोल्ड या दोन ग्लॅडीओलस फुलांच्या जाती विकसित केल्या असून, या अगोदर पीडीकेव्ही रागिणी ही शेवंती फुलाची जात विकसित केली. या शेवंती फुलाच्या जातीची मोठी मागणी आहे.
ग्लॅडीओलसची मागणी मोठी असल्याने या कृषी विद्यापीठाने या जातींच्या संशोधनावर भर दिला होता. राज्य, विदर्भाच्या वातावरणात येणाºया या जाती आहेत.
या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. हे विचारात घेऊनच ही संकरीत फुलाची जात विकसित करण्यात आली आहे.
- डॉ. व्ही. के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला