अकोलेकरांनो आता तरी सुधरा, अन्यथा जप्त वाहने नष्ट होतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:42 AM2020-04-08T10:42:04+5:302020-04-08T10:42:20+5:30
पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कर्मचाºयांसह धडक मोहीम सुरू केली आहे.
अकोला : ‘कोरोना’ या तीव्र संसर्गजन्य विषाणूचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच अकोलेकर मात्र रस्त्यावर विनाकारण दिवस-रात्र फिरत असल्याने त्यांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत; मात्र तरीही न सुधारण्याच्या मनस्थितीत असलेल्या अकोलेकरांची रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने अकोलेकरांना आता तरी सुधरा, असे आवाहनच पोलिसांनी केले आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पोलिसांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये जप्त केलेले वाहन नष्ट (स्क्रॅप) करण्याचा अधिकार पोलिसांना असून, यापुढील पाउल तेच राहणार असल्याचेही आता पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
अकोला जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण नसला तरी ६० पेक्षा अधिक कोरोना संदिग्ध असलेल्यांचे अहवाल प्राप्त झाले नसून, त्यांच्यापैकी कुणालाही पॉझिटिव्ह आढळल्यास त्यापासून अकोलेकरांना धोका आहे. अकोला शहर व जिल्हा कोरोनामुक्त राहावा म्हणून सर्व शासकीय यंत्रणा रात्रं-दिवस काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवणे हा एकमेव उपाय असल्याने त्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे; परंतु संचारबंदी असूनही जीवनावश्यक वस्तू व अतिआवश्यक रुग्णांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन बरेच नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर घेऊन विनाकारण फिरत असल्याने ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत; मात्र त्यानंतरही जवळच्या चौकात भाजी आणायलासुद्धा वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करण्याचे प्रमाण वाढतेच आहे.
तर वाहने स्क्रॅप करण्याचा अधिकार
बाहेर फिरणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कंबर कसली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कर्मचाºयांसह धडक मोहीम सुरू केली आहे. विनाकारण वाहने बाहेर फिरविणाºयांचा ओघ तत्काळ कमी न झाल्यास कार, दुचाकी, तीनचाकी जप्त करून ती नष्ट करण्याचा अधिकार पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्राप्त असून, हेच शस्त्र आता उगारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वाहतूक शाखेचे कार्यालय फुल्ल झाल्याने आता शास्त्री स्टेडियमवर जप्त केलेली वाहने ठेवण्यात येणार आहेत. गत सहा दिवसांमध्ये ३५० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. अकोला जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व विनाकारण आपली वाहने घेऊन रस्त्यावरील गर्दी वाढवू नये.
- गजानन शेळके
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, अकोला.