..अन्यथा ६ ऑगस्टपासून काम बंद!
By Admin | Published: July 24, 2015 11:45 PM2015-07-24T23:45:22+5:302015-07-24T23:45:22+5:30
अधिका-यांची मनमानी, थकीत वेतनाच्या मुद्यावर अकोला मनपा आयुक्तांना इशारा.
अकोला : स्थानिक अधिकारी-कर्मचार्यांना दिली जाणारी वागणूक, वारंवार बजावल्या जाणार्या नोटीसचा मुद्दा उपस्थित करीत संबंधित अधिकार्यांची मनमानी बंद करा, तसेच थकीत वेतन अदा न केल्यास ६ ऑगस्टपासून महापालिकेचे कामकाज बंद करणार असल्याचा इशारा मनपा कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांना देण्यात आला. मनपाच्या प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशातून मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची मोहीम सुरू केली. अवैध नळ जोडणीचा शोध घेऊन दंडात्मक मोहीम आखण्यात आली. याकरिता सर्वच विभागातील कर्मचार्यांची मदत घेण्यात येत असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली नाही. सर्व कर्मचार्यांना विविध मोहिमेत गुंतवल्याने टॅक्स वसुलीचे कामकाज पूर्णत: ठप्प पडल्याचा आरोप कर्मचारी संघर्ष समितीने केला आहे. मनपाच्या उत्पन्नात व वसुलीत वाढ झाल्याचा गवगवा होत असताना चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकीत कसे, असा सवाल संघर्ष समितीने उपस्थित करीत मडावी यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. स्थानिक अधिकारी-कर्मचार्यांना सर्वांंसमक्ष अपमानीत करणे, एकेरी भाषेत बोलणे तसेच वारंवार नोटीस देण्याच्या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा मुद्दा समितीने आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासमक्ष उपस्थित केला. अधिकार्यांनी मनमानी बंद करावी, तसेच थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्याचा निर्णय लवकर न घेतल्यास येत्या ६ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले, कैलास पुंडे, अनिल बिडवे, राजेंद्र घनबहाद्दूर, अनुप खरारे, शांताराम निंधाने, विठ्ठल देवकते, विजय सारवान, प्रताप झांझोटे, गुरू सारवान आदींसह कर्मचारी उपस्थित होते.