‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:54 PM2019-06-03T13:54:19+5:302019-06-03T13:54:24+5:30
पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे.
अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या आमचं गाव, आमचा विकास, उपक्रमानंतर येत्या २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामसभा घेऊन त्यामध्ये आराखडा निश्चित केला जाणार आहे. आराखड्यांचा अहवाल ३१ जानेवारी २०२० पर्यंत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
यापूर्वी चार वर्षांचा विकास आराखडा निश्चित झाला होता. त्यापैकी झालेली कामे वगळून नवा आराखडा तयार करावा लागणार आहे. गेल्या आराखड्यातील शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता, गावकऱ्यांचे पुढील नियोजन विचारात घेऊन ग्रामसभेमार्फत कामांचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. त्यासाठी गावातील विविध घटकांशी विचारविनिमय करणे, त्यांच्या गरजा, मागण्या विचारात घेऊन कामे, उपक्रमांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. पुढील पाच वर्षांत ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया निधीच्या दुप्पट रकमेची कामे आराखड्यात समाविष्ट केली जातील.
- अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा
ग्रामसभेत आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या प्रत्येक गणातील गावांची जबाबदारी विस्तार अधिकाºयांवर दिली जाईल. गावातील महिला, युवती, युवक, आर्थिक व सामाजिक कमकुवत घटकांना समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गणात एका मुख्य सेविकेचीही निवड करून प्रशिक्षण दिले जाईल.
- ग्रामसभेत द्यावी लागणार संपूर्ण माहिती!
ग्रामसभेत ग्रामपंचायतने आतापर्यंत हाती घेतलेले उपक्रम, कामे, त्यावर झालेला खर्च, शिल्लक निधी, पुढील पाच वर्षांत मिळणारे उत्पन्न, इतर निधीची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. सोबतच यापूर्वी ग्रामपंचायतने ठरविलेला कामांचा प्राधान्यक्रम, गावाच्या गरजा, अडचणी, त्यावरील उपाययोजनांची अंमलबजावणीही सांगितली जाईल.
- ग्रामसभेच्या पूर्वी तीन सभा
ग्रामपंचायतींमध्ये मुख्य ग्रामसभेच्या आधीच्या दिवशी महिला सभा, मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा, बालसभा अशा तीन सभा घ्याव्या लागतील. त्या तिन्ही सभांतील चर्चा व शिफारशी याबाबत ग्रामपंचायतने आराखडा निश्चित करण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होईल. बालसभेत गावातील सर्व मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, १८ वर्षांपर्यंतच्या मुले-मुली उपस्थित राहतील.