म्युकरमायकोसिसचे जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:18 PM2021-06-02T19:18:00+5:302021-06-02T19:18:06+5:30
Mucomycosis : अकोल्यासह अमरावती आणि नागपूर हे तीन जिल्हे शस्त्रक्रियांसाठी प्रमुख ठरत आहेत.
अकोला : राज्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचे संकट ओढवले आहे. अनेक रुग्णांवर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. विदर्भात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून, अकोल्यासह अमरावती आणि नागपूर हे तीन जिल्हे शस्त्रक्रियांसाठी प्रमुख ठरत आहेत. सद्य:स्थितीत अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल होण्यासाठी म्युकरमायकोसिसच्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
मागील महिनाभरापासून जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने या शस्त्रक्रिया सायनस आणि दाताशी निगडित असून, विदर्भात अकोल्यासह अमरावती जिल्ह्यात या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तसेच किचकट शस्त्रक्रिया असल्यास रुग्णांना नागपूर येथे संदर्भित केले जात आहे. सद्य:स्थितीत अकोल्यात म्युकरमायकोसिसचे जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी अकोल्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून, शंभरपेक्षा जास्त रुग्ण यातून बरे झाले आहेत. काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहे. शस्त्रक्रियेचे काम पडू नये यासाठी रुग्णांनी आजाराचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारास सुरुवात करावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला