मळसूर परिसरातील बकऱ्यांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:31+5:302021-07-25T04:17:31+5:30
अमोल देवकते मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गत आठवड्याभरात दोन बकऱ्या, ...
अमोल देवकते
मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गत आठवड्याभरात दोन बकऱ्या, दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येथून जवळच असलेल्या उमरा येथील पशू वैद्यकीय रुग्णालयातील दुरवस्था झाल्याने पशुपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
मळसूर परिसरात गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत दोन-तीन दिवसांपासून परिसरात पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच गुराढोरांवर अज्ञात आजाराने हल्ला चढविल्याने शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत सापडले आहे. गुरे आजारी होताच मळसूर येथील पशुपालक येथून जवळच असलेल्या उमरा येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात गुरांना उपचारासाठी नेतात. मात्र येथील पशू वैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था झाल्याने पशुपालक हैराण झाले आहे. याबाबत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. त्यामुळे पशुपालकांना नाईलाजाने खासगी डॉक्टरांकडे उपचार करावा लागत असल्याने पशुपालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावात पाहणी करून पशुपालकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
---------------------------
दोन बकऱ्या, दोन म्हैसींचा झाला मृत्यू
मळसूर परिसरात ताप येणे, चारा न खाणे आदी लक्षणे असलेल्या आजाराने गुरांना ग्रासले आहे. याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहे. अज्ञात आजारामुळे मळसूर येथील श्रीधर गिरी यांच्या दोन बकऱ्या, तर दिनकर देवकते यांच्या दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे.
-------------------
वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू
माझी बकऱ्या बऱ्याच दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रासलेल्या होत्या, गावात पशुवैद्यकीय अधिकारी येत नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन्ही बकऱ्या दगावल्या आहेत.
- श्रीधर गिरी, पशुपालक, मळसूर.
---------------------------
उमरा येथील पशू वैद्यकीय दवाखाना नेहमी बंद असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. उपचार अभावी दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे.
-दिनकर देवकते, पशुपालक, मळसूर.