शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव;आराेग्य सर्वेक्षणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:41+5:302021-03-04T04:34:41+5:30
संसर्गजन्य काेराेनाची लागण हाेण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा आलेख घसरत असल्याचे ...
संसर्गजन्य काेराेनाची लागण हाेण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा आलेख घसरत असल्याचे पाहून नागरिक बेफिकीर झाल्याचे समाेर आले. साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेत नसल्यामुळे पुन्हा एकदा काेराेनाने उचल खाल्ली आहे. काेराेनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ हाेत चालली असून त्यामुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. या साथीला आळा घालण्याच्या उद्देशातूनच महापालिका प्रशासनाने नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शहराच्या कानाकाेपऱ्यात रुग्ण आढळून येत असल्याने प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांनी आराेग्य सर्वेक्षणाचा निर्णय घेत ३०७ द्विसदस्यीय पथकांचे गठन केले आहे. या पथकांनी बुधवारी सर्वेक्षणाला प्रारंभ केला असून ९ मार्चपर्यंत सर्वेक्षणाची मुदत देण्यात आल्याची माहिती आहे.
स्वॅब घेण्यासाठी मनपा सक्रिय
काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मनपाने फिरत्या वाहनाद्वारे माेबाइल पथक कार्यान्वित केले आहेत. तसेच मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालय, कृषी नगर, हरिहरपेठ, अशोक नगर आदी ठिकाणी स्वॅब घेण्याला प्रारंभ केला आहे. यामुळे काेराेनाचे रुग्ण शाेधताना मदत हाेणार आहे.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या आराेग्य तपासणीसाठी सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून यादरम्यान तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना अकाेलेकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
-डाॅ.पंकज जावळे
प्रभारी आयुक्त,मनपा