बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:24+5:302021-01-25T04:19:24+5:30
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ओपीडी राहिल सुरू सोमवार आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली, तरी शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार ...
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ओपीडी राहिल सुरू
सोमवार आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली, तरी शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे. तसेच रुग्णालयांमध्ये दुपारी १ ते ४ वाजताच्या सुमारास विशेष बाह्यरुग्ण विभाग तसेच योगा वर्ग आदि उपक्रम राबविणे आवश्यक राहिल.
या आहेत मार्गदर्शक सूचना
बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी ४ ते ६ अशी राहील.
रुग्ण नोंदणी दुपारी १२.३० व सायंकाळी ६ वाजता बंद होईल.
त्यापूर्वीच केसपेपर देण्यात आलेल्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहिल.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी असल्यास दुपारची ओपीडी बंद राहिल.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना दुपारी फिरती भेट घेऊन रुग्णसेवा करणे अपेक्षित आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये दुपारची ओपीडी बंद राहिल.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दुपारी घरोघरी जाऊन रुग्णसेवा देणे बंधनकारक राहिल.
बाह्यरुग्ण विभागाच्या दोन्ही वेळा आधीपासूनच आहेत, मात्र अनेक ठिकाणी सायंकाळची ओपीडी बंद राहत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता वरिष्ठ स्तरावरून सायंकाळची ओपीडी सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला