तब्बल २0 लाख रूपयांचा प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:33 PM2019-05-18T18:33:52+5:302019-05-18T18:34:01+5:30
जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २0 लाख रूपये आहे. गुटखा जप्तीची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे विशेष पथक शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना, नवीन बैदपुरा मरघट रोड परिसरात एका ट्रकमधून दोन मालवाहू वाहनांमध्ये काही माल भरीत असल्याचे दिसले. पोलिसांची चौकशी केल्यावर प्रतिबंधीत गुटखा असल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी गुटखा, पानमसाला जप्त करून आठ जणांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २0 लाख रूपये आहे. गुटखा जप्तीची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर हे शुक्रवारी गस्तीवर असताना, त्यांना मासुम शाह चौकात एचआर ३८-डब्लू-६0४६ क्रमांकाच्या ट्रकमधून एमएच ३0-बीडी-१६८७ आणि एमएच ३0-बीडी-७८५ या मालवाहू वाहनांमध्ये काही पोते भरताना दिसून आले. पोलिसांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, त्यात प्रतिबंधीत पानमसाला व गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकचालक लखन सिताराम बघेल(२६ रा. मोहणा ग्वाल्हेर), क्लिनर लाखन द्वारका बघेल(२४ रा. मोहणा ग्वाल्हेर), मालवाहू वाहनाचे चालक शेख सलमान शेख हुसैन(२१ रा. हाजी नगर शिवणी), आदिल खान फिरोज खान(२३ रा. जुना बैदपुरा), तन्वीर खान हसन खान(३५ रा. जुना बैदपुरा), तबरेज खान युनूस खान(२२ रा जुना बैदपुरा), सुबेदार खान रसुउल्ला खान(३0 रा. हाजी नगर शिवणी) आणि जावेद खान रसुल खान(३३ रा. हाजी नगर शिवणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत तंबाखूचे ३0 पोते(किंमत ९ लाख रूपये) आणि पानमसाला व सुगंधीत तंबाखूचे ३५ पोते(१0 लाख ५0 हजार रूपये), पानमसाल्याचे एक पोते(किंमत ३१ हजार) असा एकूण १९ लाख ८१ हजार रूपयांचा गुटखा आणि एक ट्रक(३0 लाख २0 हजार रूपये), दोन मालवाहू वाहने(१0 लाख रूपये) असा मुद्देमाल जप्त केला. हा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूचा माल सिंधी कॅम्प कालू सेठ नामक व्यक्ती आणि जुना बैदपुऱ्यातील वहिद खानचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे पांडे नामक व्यक्तीच्या मार्फत गुटख्याचा माल ट्रकमधून उतरवित होते. हा संपूर्ण माल अन्न व औषध प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.