‘आरटीई’ प्रवेशाची दोन हजारावर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:58 PM2020-05-30T17:58:30+5:302020-05-30T17:58:34+5:30
२0१ शाळांमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली; परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे प्रवेश रखडले आहेत.
अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’नुसार इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. अकोला जिल्ह्यातून ७ हजारांवर पालकांनी राखीव जागांसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी २0१ शाळांमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली; परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे प्रवेश रखडले आहेत.
यंदा ‘आरटीई’च्या २५ टक्के जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. जिल्ह्यातील २0१ शाळांनी ‘आरटीई’साठी नोंदणी केली होती. यानुसार जिल्हाभरातून ७ हजार ३३३ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले होते. शिक्षण विभागाने लॉटरी पद्धतीने एकूण २ हजार २७८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली; परंतु सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे पालकांना शाळेत जाऊन पहिल्या वर्गामध्ये प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे; परंतु अद्यापपर्यंत कोणतीही सूचना पालकांना न मिळाल्यामुळे पालक संभ्रमात आहेत. याविषयीची पालकांना चिंता सतावत आहे.
प्रतीक्षा यादीतील पालकही लटकले!
जिल्ह्यातील अनेक पालकांना प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे संदेश आले आहेत; परंतु २५ टक्के जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचेच प्रवेश रखडले आहेत. त्यांचे प्रवेश निश्चित झाल्याशिवाय प्रतीक्षा यादीतील पालकांना प्रवेशासाठी स्थान मिळणार नाही. त्यामुळे या पालकांनाही प्रतीक्षा यादीतून नाव निघून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करणे भाग पडत आहे.
शाळांकडून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी समूह एकत्र येण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, अशी चिंता शाळांना सतावत होती. त्यावर मात करण्यासाठी शहरातील अनेक नामांकित शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. याला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये आॅनलाइन प्रवेश देत आहेत. तसेच डोनेशन, शैक्षणिकसुद्धा आॅनलाइन भरीत असल्याचे दिसून येत आहे.