३० हजारांवर नागरिक ठरले कोरोनावर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:15+5:302021-04-26T04:16:15+5:30
अकोला: अकाेल्यात सात एप्रिल, २०२० राेजी पहिला कोराेना रुग्ण आढळून आल्यानंतर, काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. ...
अकोला: अकाेल्यात सात एप्रिल, २०२० राेजी पहिला कोराेना रुग्ण आढळून आल्यानंतर, काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्यंतरी काेराेना संपला, असे दिलासादायक चित्र असतानाच काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली अन् कोराेनाचे थैमान पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढले आहे. सध्या तर रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही, अशी नकारात्मक स्थिती असतानाही तब्बल ३० हजारांवर रुग्णांनी कोराेनावर मात करून काेराेनाला हरविण्यात यश मिळविले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे हे संकट वाढत असताना, एकूण चाचणीतील निगेटिव्ह अहवाल आणि बरे होणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा काही प्रमाणात दिलासा देणारा ठरत आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ८५ टक्के म्हणजेच ३० हजार २७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांचेही लक्षणीय प्रमाण आहे, त्यामुळे कोरोनाला न घाबरता नियमांचे पालन करून, त्याविरुद्ध लढणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, दररोज रुग्णसंख्या वाढ होत आहे. सोबतच मृत्यूचाही आकडा वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे. या सर्व संकटावर मात करून रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. काेराेनावर मात करण्यासाठी प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट यासाेबतच मास्क वापरा, अंतर पाळा, हात धुवा या त्रिसूत्रीवर अधिक भर दिल्याने रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, योग्य वेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही, तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.
...............
अनेकांना एकूण चाचण्या - २ लाख ९६ हजार ९८०
एकूण पॉझिटिव्ह - ३७,२८३
रॅपिड एकूण चाचणी - १ लाख ०२,४८०
पॉझिटिव्ह - ८ हजार १८६
आरटीपीसीआर - १,९४,५०० चाचण्या
निगेटिव्ह -१,६५,५०१
पॉझिटिव्ह - ३७ हजार २०३
बरे झाले - ३०,२७१
.........
काेट...
कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुप्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे हलगर्जी जिवावर बेतू शकते.
- डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
......
काेट
काेराेनाला घाबरू नका, या आजारात काेणी जवळ नसते, हीच भीती रुग्णाला खाते. त्यामुळे भीती नका बाळगू. मी बरा हाेईल, हीच आशा ठेवा, तुम्ही बरे व्हाल, मीही सतत तसाच विचार केला.
गुलाबराव साेळंके, वय ५९ मलकापूर
..............
काेट...
काेराेना झाला, या धास्तीनेच मी घाबरलाे हाेताे, पण घरातील सर्वांनी धीर दिला, घाबरू नका, आम्ही जवळ राहणार नाही, पण मनाने साेबत राहू, असे सांगून रुग्णालयात दाखल केले. एकच दिवस ऑक्सिजन लावला हाेता. दुसऱ्या दिवसापासून गरज नाही पडली. फक्त चांगला विचार केला. औषधे वेळवर घेतली, आता पूर्ण बरा झालाे आहे.
वासुदेव इंगळे वय ६८
गृहविलगीकरणातील रुग्णांनी घ्यावी काळजी
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १,५०० रुग्ण रुग्णालये, तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांनी आयसाेलेशनमध्येच राहणे अपेक्षित आहे. त्यांच्यामुळे घरातील, तसेच शेजारी कुणालाही संसर्ग हाेणार नाही, याची काळजी रुग्णांनी घेतली, तर कोराेनाच्या प्रसाराला अटकाव हाेऊ शकेल.