‘किसान सन्मान’च्या हफ्त्याला ८ हजारांवर शेतकरी मुकणार! इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी
By रवी दामोदर | Published: February 26, 2024 07:38 PM2024-02-26T19:38:02+5:302024-02-26T19:38:10+5:30
अकोला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६ वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचे दोन हफ्त्याचे वितरण शेतकऱ्यांना लवकरच करण्यात येणार आहे.
रवी दामोदर, अकोला : अकोला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६ वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचे दोन हफ्त्याचे वितरण शेतकऱ्यांना लवकरच करण्यात येणार आहे. परंतू जिल्ह्यात अद्यापही ८ हजार ६४१ शेतकऱ्यांची इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी असल्याने ते शेतकरी किसान सन्मानच्या हफ्त्याला मुकण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात कृषी विभागामार्फत मोहीम राबवून जनजागृती सुरू असून, पात्र शेतकऱ्यांनी इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण करण्याची आवश्यकता आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभर्थ्यांचे इ-केवायसी, बँक खाते आधार सलग्नी करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत. योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत दि. १२ ते २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत इ-केवयासी व बँक खाते आधार सलग्न करणेबाबत मोहीम राबविण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही अकोला जिल्ह्यात ३ हजार १०५ लाभार्थी शेतकऱ्यांची इ-केवायसी व ५ हजार ५३६ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सलग्न करणे प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घेण्याची गरज आहे. अन्यथा ‘पीएम किसान’च्या १६ वा हप्त्यापासून व नमो किसान महासन्मान निधीच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतील.
इ-केवायसी व बँक खाते आधार सलग्नी करणे संदर्भात काही अडचण असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा.
- शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला.