८ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:45 AM2021-09-13T10:45:08+5:302021-09-13T10:45:56+5:30
NEET exam : भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मार्कांचा कटऑफ कमी होणार असल्याची भीती शिक्षण तज्ज्ञांची व्यक्त केली.
अकोला: अत्यंत महत्वाची असणारी नीटची परीक्षा अखेर रविवारी शहरातील २५ परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडली. जिल्ह्यातून ८ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार २०० विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. यंदा भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मार्कांचा कटऑफ कमी होणार असल्याची भीती शिक्षण तज्ज्ञांची व्यक्त केली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा महत्वाची समजली जाते. दहावी, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नीट परीक्षेची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होईल की नाही. याबाबत संभ्रम होता. परंतु केंद्र शासनाने नीट परीक्षेची तारीख जाहीर केली. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कालावधीत अभ्यास करून नीट परीक्षेची चांगली तयारी केली. यंदा पेपर कसा येतो. याची विद्यार्थ्यांसह पालकांनाही चिंता सतावत होती. पालकांची ही चिंता खरी ठरली. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर सोपी आले असले तरी भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आल्यामुळे विद्यार्थ्यांची थोडी अडचण झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. नीट परीक्षेसाठी जिल्ह्यातून ८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार २०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २५ केंद्रांवर शांततेत परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना थर्मल स्कॅनिंग व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून वर्गांमध्ये सोडण्यात आले. परीक्षेच्या समन्वयक म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य नीता तलरेजा यांच्यासह परीक्षा केंद्रांवर ७५० केंद्र संचालक, समन्वयक व कर्मचारी तैनात होते.
पेपर झाल्यावर मार्कांची जुळवणी
नीटचा पेपर झाल्यावर परीक्षा केंद्रांवरून बाहेर पडत, पालकांसह विद्यार्थ्यांनी थेट तज्ज्ञ मार्गदर्शकांना गाठले आणि पेपर कसा आणि किती साेडवला. हे पडताळून पाहिले. किती प्रश्न सोडविले. किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली याचीही पडताळणी विद्यार्थी व संबंधित शिक्षकांनी केली. त्यानुसार नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांचा अंदाज बांधण्यात आला.
नीट परीक्षेमध्ये जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाचे पेपर सोपे होते. परंतु अपेक्षापेक्षा भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्कांचा कटऑफ कमी येण्याची शक्यता आहे. परंतु दोन विषय सोपी असल्यामुळे विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे गुण मिळवून वैद्यकीय प्रवेश मिळवतील.
-प्रा. ललित काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ