चार हजारांवर शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:01 PM2020-04-01T12:01:55+5:302020-04-01T12:02:02+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९८ शिक्षकांनी ‘निष्ठा’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
अकोला: मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत संपूर्ण देशात ‘निष्ठा’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९८ शिक्षकांनी ‘निष्ठा’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांना शिकविताना या प्रशिक्षणाचा शिक्षकांना लाभ होणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘निष्ठा’ची अंमलबजावणी होणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तालुकानिहाय नियोजनानुसार ६ मार्चपर्यंत शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविणारे शिक्षक, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, डायटमधील सर्व अधिकारी या सर्वांना निष्ठाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली यांनी तयार केलेल्या निष्ठा पोर्टलवर आॅनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा शैक्षणिकदृष्ट्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)छाया: शिक्षकांचा फोटो
जिल्ह्यातील चार हजारांवर शिक्षकांना गत महिनाभरात ‘निष्ठा’चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे शालेय गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचे, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- डॉ. समाधान डुकरे, प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.
‘निष्ठा’ प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, शालेय नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये,पर्यावरणविषयक जनजागृती, शाळापूर्व शिक्षण व आनंददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन तसेच गणित-विज्ञान व भाषा अध्यापनशास्त्र अशा विविध विषयांच्या अनुषंगाने कृतियुक्त प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- जितेंद्र काठोळे
निष्ठा प्रशिक्षण प्रशिक्षक
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.