नऊ लाखांवर वीज ग्राहकांनी केली मोबाइल क्रमांकाची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:54 PM2021-05-04T12:54:56+5:302021-05-04T12:55:04+5:30
MSEDCL News : ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे.
अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा एकूण १० लाख ७ हजार ३४६ वीज ग्राहकांपैकी २८ एप्रिल २०२१अखेर ९ लाख ७४५ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची आतापर्यंत नोंदणी महावितरणकडे केली आहे. या सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे.
वीज का गेली, महावितरणचे वीज बिल किती आले, मीटर रीडिंग झाली की नाही, या व अशाप्रकारच्या वीज ग्राहकांना उपयुक्त असणाऱ्या माहितींचे विविध ‘अपडेट्स’ महावितरणकडून सातत्याने देण्यात येतात. हे ‘अपडेट्स’ ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या अधिकृत मोबाइलवर पाठविण्यात येतात. त्यामुळे अशी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे असते. पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती दरमहा ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येते.
अकोला जिल्ह्यांतर्गत ०३ लाख ७० हजार ८१० ग्राहकांपैकी ०३ लाख २८ हजार १९५ ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. अकोला ग्रामीण विभागातील ०१ लाख ५२ हजार ६६० ग्राहकांपैकी ०१ लाख ३७ हजार ३५० वीज ग्राहकांनी, अकोला शहर विभागातील ०१ लाख ३१ हजार ७४७ ग्राहकांपैकी ०१ लाख २१ हजार ९३८ ग्राहकांनी, अकोट विभागातील ८६ हजार ४०३ ग्राहकांपैकी ६८ हजार ९०७ ग्राहकांनी आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी केल्याने त्यांना महावितरणचे अपडेट्स नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळत आहे.
बुलडाणा जिल्ह्यांतर्गत बुलडाणा विभागातील ०१ लाख ५३ हजार ८६१ ग्राहकांपैकी ०१ लाख ३८ हजार ७८८ वीज ग्राहकांना, खामगाव विभागातील ०१ लाख ७० हजार १२८ ग्राहकांपैकी ०१ लाख ५२ हजार ६४७ वीज ग्राहकांना आणि मलकापूर विभागातील ०१ लाख २८ हजार १४९ ग्राहकांपैकी ०१ लाख २० हजार ४१ ग्राहकांना म्हणजेच जिल्ह्यातील ०४ लाख ५२ हजार १३८ ग्राहकांपैकी ०४ लाख ११ हजार ४७६ ग्राहकांना महावितरणच्या या अपडेट्स सुविधेचा लाभ मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील ०१ लाख ८४ हजार ३९८ ग्राहकांपैकी ०१ लाख ६१ हजार ७४ ग्राहकांनी आपले मोबाइल नंबर महावितरणकडे नोंदणी केल्याने त्यांना महावितरणच्या वरील सुविधेचा लाभ मिळत आहे. अकोला परिमंडळांतर्गत असलेल्या तिन्ही जिल्ह्यांतील मोबाइल नंबर नोंदणी झालेल्या ग्राहकांची टक्केवारी बघितल्यास सर्वांत जास्त म्हणजे ९१.०१ टक्के बुलडाणा जिल्हा, ८८.५१ टक्के अकोला जिल्हा आणि ८७.३५ टक्के वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणचे अपडेट्स मिळत आहे.