अकाेला जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थींनी घेतली कोविड लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:41 PM2021-04-08T12:41:41+5:302021-04-08T12:42:30+5:30
Corona Vaccination: जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकाेला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना जिल्ह्यात १६ मार्चपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्करसह ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात आले असून, आतापर्यंत १ लाख १५ हजार लाभार्थींनी लस घेतली. लाभार्थींमध्ये कोविड लसीकरणाचा उत्साह असताना जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला अज्ञानामुळे अनेकांनी लस घेण्यास टाळले, मात्र लसीचे चांगले परिणाम समोर आल्यानंतर लाभार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसू लागले. हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्ससह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाल्याने लाभार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे १ लाख १५ हजार लाभार्थींनी कोरोनाची लस घेतली. लाभार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेळेवर लसींचा साठा उपलब्ध न झाल्यास कोविड लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
९ एप्रिल रोजी येणार लसींचा साठा
जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच कोविड लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत कोविड लसीकरण खंडित होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला लसींचा साठा मिळण्याची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
४५ वर्षांखालील लाभार्थींना लसींची प्रतीक्षा
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोविड लस दिली जात असून, त्यांच्या उत्साह दिसून येत आहे. हाच उत्साह ४५ वर्षांखालील लाभार्थींमध्येदेखील दिसून येत असून, त्यांना लस मिळणार अशी आशा असून, शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.