जुन्या बायपासवरील उड्डाणपूल होतोय अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:53 PM2019-12-20T13:53:40+5:302019-12-20T13:54:18+5:30
जुन्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल आता अरुंद बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाशिम बायपास मार्गावर गत काही दिवसांपासून दुसऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले; मात्र यातील मूळ अडचण अजूनही दूर झालेली नाही. अनेक पर्याय शोधून काही उपाय न झाल्याने जुन्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल आता अरुंद बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्रस्तावित पुलाची रुंदी १२ मीटर होती; मात्र जागेअभावी आता ८.५ मीटरची रुंदी या पुलाची राहणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटित केलेल्या अकोल्यातील दोन्ही उड्डाणपुलांच्या निर्मितीला सुरुवात झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू असले तरी जुन्या वाशिम बायपास मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरापासून सातत्याने रखडलेले होते. जेल चौकापासून नेहरू पार्ककडे जाणाºया मार्गावर उड्डाणपुलासाठी जागा मिळत नव्हती. एका बाजूने खासगी रुग्णालय, एनसीसी कार्यालय, बीएसएनएल अधिकाऱ्यांची वसाहत, हुतात्मा स्मारक आदी शासकीय जागांचे भूखंड आहेत.
दुसºया बाजूने निवासी वसाहत आहे. या मार्गाची रुंदी २४ फूट असल्याने यावर १२ फूट रुंदीचा उड्डाणपूल बांधणे अशक्य होते. जमीन अधिग्रहित करण्याच्या सबबीखाली एक वर्ष ताटकळत राहिल्यानंतरही पर्याय निघाला नाही. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाची रुंदी ८.५ आकाराची करीत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली आहे. आता उड्डाणपुलाची रुंदी ८.५ आणि उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना ५.५ चा सर्व्हिस रोड सुटणार आहे. उर्वरित ४.५ फूट जागा पादचारी यांच्यासाठी शिल्लक ठेवली जाणार आहे. नाईक हास्पिटल ते निमवाडीपर्यंत विस्तारित होत असलेल्या या उड्डाणपुलासाठी एकूण नऊ पिल्लरची उभारणी होत आहे. त्यातील पाच पिल्लर उभारणीचे खोदकामही झाले असून, या उड्डाणपुलाच्या निर्मितीची गतीही आता वाढली आहे.