शेगाव-देवरी मार्गाने ओव्हरलोड वाहतूक वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 AM2020-12-04T04:51:52+5:302020-12-04T04:51:52+5:30
अकाश उमाळे अंदुरा : शेगाव-देवरी मार्गाने ओव्हरलोड वाहनांची वाहतूक जोरात सुरू आहे. वाहने सुसाट ये-जा करीत असून, ओव्हरलोड ...
अकाश उमाळे
अंदुरा : शेगाव-देवरी मार्गाने ओव्हरलोड वाहनांची वाहतूक जोरात सुरू आहे. वाहने सुसाट ये-जा करीत असून, ओव्हरलोड झालेली ही वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. या मार्गाने बेधुंद गाण्याच्या धुंदीत ट्रॅक्टर चालविले जात असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, दुचाकीधारक व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
शेगाव - देवरी मार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर कोणत्याच ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या मार्गावर वाहने सुसाट आहेत, तसेच क्षमतेपेक्षा जादा ओव्हरलोड असलेली वाहनांची संख्या ही या मार्गाने वाढली आहे. त्यामुळे वाहने ओव्हरलोड असल्याने हेलकावे खात रस्त्यावर इकडे तिकडे करीत सुसाट धावत आहेत. याचा फटका मागून येणाऱ्या दुचाकीधारकास बसण्याची शक्यता आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात सापडला आहे. रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्ता चांगला असला, तरी काही ठिकाणी काम होण्याचे राहून गेल्याने खड्डे ‘जैसे थे’ आहेत. या मार्गाने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने अशा वाहनांवर कारवाई करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
------------------------
गाव तिथे गतिरोधक बसविण्याची मागणी
शेगाव-देवरी मार्गाचे काम झाल्याने या मार्गाने सुसाट वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या गावांच्या फाट्यानजीक गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.