राज्यातील परिचारिकांवर ओव्हर टाइमचा ‘लोड’; तीन हजारांवर पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:10 PM2019-05-17T14:10:28+5:302019-05-17T14:10:32+5:30
राज्यात सध्याच्या परिस्थितीत परिचारिकांची ३ हजार ४१० पदे रिक्त असल्याने परिचारिकांना सलग ओव्हर टाइम ड्युटी करावी लागत आहे.
अकोला : रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे परिचारिका. राज्यात सध्याच्या परिस्थितीत परिचारिकांची ३ हजार ४१० पदे रिक्त असल्याने परिचारिकांना सलग ओव्हर टाइम ड्युटी करावी लागत आहे.
महाराष्ट्रातील शहरी आणि दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांसह आता प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता भासू लागली आहे. राज्यातील सरकारी आणि जिल्हा रुग्णालयात परिचारिकेच्या २५ हजार २७४ च्या पदांना राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली; पण ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असल्याने परिचारिका कामासाठी तयार होत नाहीत. त्यामुळेच राज्यात तब्बल तीन हजार ४१० पदे रिक्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार, शहरी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एका रुग्णामागे आवश्यक परिचारिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, शहरी भागात एका रुग्णामागे तीन, तर ग्रामीण भागात एका रुग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या पदभरतीपैकी केवळ २१ हजार ९४७ पदे भरण्यात आली असून, उर्वरित तीन हजार ४१० पदे अद्यापही रिक्तच आहेत.
ग्रामीण भागात सेवा देण्यास नकार
ग्रामीण भागातील अपुऱ्या सेवा-सुविधांमुळे या ठिकाणी जाण्यास परिचारिका टाळाटाळ करतात. ग्रामीण भागात रुग्णसेवा देण्यास नकार देण्यात येत असल्याने परिचारिकांची संख्या कमी पडत आहे.
अशी आहेत रिक्त पदे
संवर्ग - रिक्त पदे
सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग
अधिसेविका वर्ग- ३ - २४
सहायक अधिसेविका - ९२
सार्वजनिक आरोग्य परिचारिका - ७
शुश्रूषा अधिकारी - १२१
लसीकरणासाठी परिचारिका - ९९
मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका - ८२
बालरुग्ण परिचारिका - ९०
परिसेविका - ३६२
अधिसेविका (स्टॉफ नर्स) - १२१८
लेडी हेल्थ वर्कर्स - २०७६
एएनएम नर्सेस - १०४८
परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. शासनाच्या मेगा भरतीमध्ये ही रिक्तपदे भरण्यात येणार असून, नव्याने पदावर रुजू होणाºया परिचारिकांची ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागात नियुक्ती केली जाईल. त्यामुळे ही समस्या निकाली लागणार आहे.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला विभाग.