लग्नाचा खर्च टाळत, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:15 AM2021-06-03T04:15:07+5:302021-06-03T04:15:07+5:30
बार्शीटाकली : सध्याची कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन लग्नात होणाऱ्या अवाजवी खर्चाला फाटा देत तालुक्यातील जांब वसु येथील नवरदेवाने ...
बार्शीटाकली : सध्याची कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन लग्नात होणाऱ्या अवाजवी खर्चाला फाटा देत तालुक्यातील जांब वसु येथील नवरदेवाने ६१ हजार रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोरोना रुग्णांसाठी ३० मे रोजी धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. जांब वसु येथील सुधीर बाबुसिंग राठोड याचा लग्न सोहळा ३१ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भांब येथे पार पडला. वराकडील मंडळींना येणाऱ्या लग्नाचा अवाजवी खर्च टाळून सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता, अत्यंत साध्या पद्धतीने शासनाचे नियम पाळून सुधीरने प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. तसेच मास्क, १०० सॅनिटायझरच्या बाटल्या शंभर वृक्षांचे सुद्धा वाटप केले. हा तालुक्यातील पहिलाच आदर्श उपक्रम सुधीरने घडवून आणला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, शंकरराव लंगोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. आंधळे, सचिन सांभारे, शिक्षक शेषराव जाधव, जगदीश जाधव, वसंता राठोड, लक्ष्मण राठोड, किसन राठोड, तुकाराम शेळके, अनंता लोखंडे व जाम वसुकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो:
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरने मिळणार जीवनदान
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हवेतील ७० टक्के नायट्रोजन बाहेर टाकून ऑक्सिजन साठवून ठेवते. ग्रामीण स्तरावर आरोग्य केंद्रात एखादा ऑक्सिजनची आवश्यकता असणारा गंभीर रुग्ण आल्यास त्यावर प्राथमिक उपचारानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी अशा रुग्णाला रुग्णवाहिकेतून जाण्यासाठीचे अंतर गाठताना हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महत्त्वाचे ठरू शकते. हा तालुक्यातील पहिलाच आदर्श उपक्रम सुधीरने घडवून आणला आहे.
सध्या कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन वेळेवर मिळत नाही. तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनअभावी आतापर्यंत अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच मी लग्नाचा खर्च टाळून प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले.
-सुधीर राठोड