तेल्हारा येथे उभारलेला ऑक्सिजन प्लांट ठरतोय ‘पांढरा हत्ती’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:14+5:302021-07-28T04:20:14+5:30
तेल्हारा: येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अनेक दिवसांपासून उभा राहिला; मात्र विजेचा पुरवठा नसल्याने ऑक्सिजन प्लांट केवळ शोभेची वास्तू ...
तेल्हारा: येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अनेक दिवसांपासून उभा राहिला; मात्र विजेचा पुरवठा नसल्याने ऑक्सिजन प्लांट केवळ शोभेची वास्तू म्हणून उभा असून, केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. यासाठी महावितरण विभागाने लागणारा खर्च आरोग्य विभागाकडे दिला असून, आरोग्य विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे चेंडू टोलविला आहे.
राज्यात ऑक्सिजनची कमतरता बघता प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टचे भूमिपूजन केले. ऑक्सिजन प्लांट उभा राहिला; मात्र यासाठी लागणारा वीजपुरवठा बघता येथे स्वतंत्र वीज रोहित्राची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाने याबाबत महावितरणला अवगत केले; मात्र महावितरणने वीज रोहित्रासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून याचा खर्च आरोग्य विभागाला करावा लागेल, असे सूचित केले. त्यावर ग्रामीण रुग्णालयाने हे अंदाजपत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले. त्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले असल्याची माहिती आहे; मात्र अद्यापही तालुक्यातील उभारलेला एकमेव ऑक्सिजन प्लान्ट हा विजेअभावी शोभेची वास्तू बनला आहे. (फोटो)
------------------
तिसरी लाट रोखणार कशी?
जिल्ह्यासह तालुक्यात सद्यस्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या घसरली आहे; मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यासाठी मध्यंतरी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली. त्यानुसार तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभा राहिला; मात्र वीजपुरवठ्याअभावी हा ऑक्सिजन प्लांट केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.