खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:29 PM2020-08-28T13:29:35+5:302020-08-28T13:29:39+5:30
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनची उपलब्धता अनिवार्य आहे. अशातच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील आॅक्सिजन पुरवठादारांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अकोल्यात आॅक्सिजन निर्मितीचे दोन प्लान्ट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो; मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, आॅक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. सर्वोपचार रुग्णालयाला आॅक्सिजन सिलिंडरचा मुबलक पुरवठा होत असला, तरी इतर खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसाठी नागपूर आणि जालना येथून आॅक्सिजन सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. नागपूर येथून आठवड्यातून एकदाच टँकर येतो. त्यामध्ये केवळ ९५० सिलिंडर भरल्या जात असल्याने खासगी रुग्णालयांचे अडीच दिवसांचे काम भागते. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास खासगी रुग्णालयात आॅक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागेल. ही परिस्थिती उद््भवू नये, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. यासंदर्भात खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन पुरवठा करणाºया पुरवठादार डॉ. स्वप्नील ठाकरे, जयेश वोरा, अनूप बगडिया आदींनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अमरावतीहून आॅक्सिजनची मागणी
सूत्रांच्या माहितीनुसार, गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात आॅक्सिजनचा तुटवडा असल्याने तेथील प्रशासनाने अकोला जिल्हा प्रशासनाला आॅक्सिजनची मागणी केली होती; मात्र जिल्ह्यातच आॅक्सिजनचा तुटवडा असल्याने अमरावती जिल्ह्याला आॅक्सिजनचा पुरवठा करणे शक्य झाले नसल्याची माहिती आहे.