सर्वोपचार रुग्णालयामध्ये लागणार ‘ऑक्सिजन टँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 10:32 AM2020-06-14T10:32:27+5:302020-06-14T10:32:39+5:30
र्वोपचार रुग्णालयात ‘ऑक्सिजन टँक’ बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील मृत्यूदर जास्त आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची कमी पडू नये, यासाठी सर्वोपचार रुग्णालयात ‘ऑक्सिजन टँक’ बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एकाचा बळी जात आहे. हे सर्व गंभीर रुग्ण असून, त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे अशा गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. सध्या तरी सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनचा जास्त तुटवडा नसला, तरी कोरोनाचा संभाव्य धोका पाहता आगामी काळात ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणात कमी भासू शकते. संभाव्य परिस्थितीचा अंदाज लावता तत्कालीन प्रभावी अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी २५ मे रोजी अरोग्य सचिवांना ऑक्सिजन टँकसंदर्भात प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोग्य सचिवांकडून हा प्रस्ताव पारित झाल्यास, सर्वोपचार रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध राहणार आहे.
विदर्भातील असेल पहिलाच प्रोजेक्ट!
सर्वोपचार रुग्णालायमधील प्रस्तावित ऑक्सिजन टँकला मंजुरी मिळाल्यास अकोल्यातील सर्वोपाचार रुग्णालय हे विदर्भातील पहिलेच रुग्णालय ठरू शकते, असा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
४२० ‘सीबीएम’ची असेल क्षमता
सर्वोपचार रुग्णालयातील प्रस्तावित ऑक्सिजन टँक ४२० ‘सीबीएम’ क्युबिक मीटर क्षमतेची असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता राहणार नाही.