व्यापाऱ्यांच्या काेराेना चाचणीचा वेग मंदावला; बाधितांचा आकडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 10:29 AM2021-03-10T10:29:36+5:302021-03-10T10:29:43+5:30
CoronaVirus : व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र असले तरी चाचणीचा वेग मंदावल्याचे समाेर आले आहे.
अकोला : शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा प्रशासनाने अकाेलेकरांना काेराेना चाचणीचे आवाहन केले. चाचणीचा अहवाल नसेल तर दुकानांना सील लावले जाईल, या धास्तीपाेटी व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र असले तरी चाचणीचा वेग मंदावल्याचे समाेर आले आहे. दुसरीकडे काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला असून, मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील २७० जणांना काेराेनाची लागण झाली आहे. शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लाॅकडाऊनमुळे उद्याेग व व्यवसाय संकटात सापडल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली. यासाठी व्यापारी व कामगारांना काेराेना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा दुकानांना सील लावण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली. कारवाईच्या धास्तीपाेटी का हाेईना व्यापारी, कामगार व काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी चाचणीसाठी एकच गर्दी केली. मनपाचे नागरी आराेग्य केंद्र तसेच विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स, विविध व्यापारी संघटना व नगरसेवकांच्या मदतीने सुरू केलेल्या चाचणी केंद्रांवर मंगळवारी एकूण १ हजार ४६३ नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. एकूणच चित्र लक्षात घेता काेराेना चाचणीचा वेग काहीसा मंदावल्याचे समाेर आले आहे.
१ हजार ४२८ जणांना दिलासा
मनपाचे रुग्णालय व शहरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या चाचणी केंद्रांवर ४८० नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ९८३ नागरिकांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली. चाचणीअंती ३५ नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले असून, १ हजार ४२८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या ठिकाणी चाचणीसाठी गर्दी
कस्तुरबा गांधी रुग्णालय, चौधरी विद्यालय, रतनलाल प्लॉट, जीएमडी मार्केट रामनगर, मनपा शाळा क्र. १६, आदर्श काॅलनी, हरिहरपेठ, नायगांव, किसनीबाई भरतीया रुग्णालय, मनपा आयुर्वेदिक दवाखाना अशोक नगर, माेठी उमरी येथील विठ्ठल मंदिर, सातव चौक या ठिकाणी चाचणीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
२७० जणांवर उपचार
मागील काही दिवसांपासून शहरात काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अकाेलेकरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागांतील २७० जण काेराेना पाॅझिटिव्ह निघाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे.