शहरात एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी पाेलिसांचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:25+5:302021-07-29T04:19:25+5:30
अकाेला : मुंबई, पुणे, नाशिकसारख्या माेठ्या शहरांसह विदेशात स्थायिक असलेल्या अनेकांचे वृद्ध आई-वडील अकाेल्यात एकटेच राहत असून, या ...
अकाेला : मुंबई, पुणे, नाशिकसारख्या माेठ्या शहरांसह विदेशात स्थायिक असलेल्या अनेकांचे वृद्ध आई-वडील अकाेल्यात एकटेच राहत असून, या वृद्धांच्या देखभालीसाठी पाेलीस विभागाने पाऊल उचलले आहे़ कम्युनिटी पाेलिसिंगअंतर्गत या वृद्धांचे माेबाइल क्रमांक घेण्यात आले असून, त्यांचे व्हाॅटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. कुणालाही काही अडचण असल्यास त्या ग्रुपवर मेसेज टाकताच संबंधित पाेलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या समस्या साेडविण्याचे काम करीत आहेत.
ज्यांच्याकडे स्मार्ट फाेन नाहीत त्यांना पाेलीस कर्मचाऱ्यांचे माेबाइल क्रमांक देण्यात आले आहेत, त्यामुळे कुणालाही अडचण असल्यास तातडीने संपर्क साधल्यानंतर मदत देण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी पाेलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक परिसरात असलेल्या बीट जमादारावर त्या परिसरातील वृद्धांची माहिती गाेळा करण्याची जबाबदारी देण्यात आली हाेती. ही माहिती गाेळा केल्यानंतर संबंधित पाेलीस कर्मचाऱ्यांनी व्हाॅटस्ॲप ग्रुप तयार केले आहेत.
विशेष म्हणजे, खुद्द पाेलीस अधीक्षक दर दाेन तीन दिवसांआड याचा आढावा घेत असून, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देत आहेत.
शहरात एकटे राहणाऱ्या वृद्धांची पाेलीस अधीक्षक कार्यालयात नाेंद आहे. या वृद्धांची एक यादी तयार करून विविध पथक, ठाणेदारांना देण्यात आली आहे. विविध भागांत राहणाऱ्या वृद्धांच्या घरी भेट देण्याचे नियाेजन पाेलिसांनी केले आहे. वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्या साेडविण्याचा प्रयत्नही पाेलीस विभागाकडून केला जात आहे.
आराेग्य सुविधा पुरविण्याचे काम
शहरासाेबतच जिल्ह्यात असलेल्या २३ पाेलीस ठाण्यांतर्गत एकट्या राहणाऱ्या वृद्धांची काळजी घेण्याबाबत ठाणेदारांना पाेलीस अधीक्षकांनी सूचित केले आहे. विशेष म्हणजे, काेराेनाकाळात जिल्ह्यातील सर्वच पाेलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वृद्धांना आराेग्य सुविधा पुरविण्याचे काम पाेलिसांनी केले आहे़
कम्युनिटी पाेलिसिंगअंतर्गत वृद्धांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जे वृद्ध एकटे राहतात, ज्यांची मुले विदेशात, मुंबईसारख्या माेठ्या शहरांमध्ये राहतात त्यांच्या आई-वडिलांच्या आराेग्याची काळजी अकाेला पाेलीस घेत आहेत. यासाठी व्हाॅटस्ॲप ग्रुपही तयार करण्यात आले आहेत.
जी. श्रीधर
पाेलीस अधीक्षक, अकाेला
पाेलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी पाेलिसिंगमुळे वृद्धांना चांगला आधार मिळाला आहे. काही अडचण असल्यास त्यांचे माेबाइल नंबरही आमच्याकडे दिलेले आहेत.
- यादवराव देशमुख, माेठी उमरी
काेणत्याही वृद्धाला काही अडचण असेल तर व्हाॅटस्ॲप ग्रुपवर माहिती टाकण्यात येते. यासाठी प्रत्येकाजवळ माेबाइल असणे गरजेचे नाही. संबंधित पाेलीस कर्मचारी तातडीने येऊन विचारपूस करतात.
भीमराव जाधव, काैलखेड-
काेराेनाकाळात वृद्धांकडे विशेष लक्ष
शहरातील अनेक वृद्धांना विविध आजार असल्याने दैनंदिन औषधी सुरू आहेत. याकरिता पाेलीस विभागाने या बाबीकडे विशेष लक्ष काेराेनाच्या काळात पुरविले हाेते. वाहतूक शाखेने अनेक वृद्धांना रुग्णालयात जाण्यासाठी मदतही केली हाेती.
जिल्ह्यातील पोलीस ठाणे २३
पोलीस अधिकारी १६१
पोलीस २४६५
जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाची लोकसंख्या
३७५०००