अकोल्याची पलक करणार देशाचे प्रतिनिधित्व, कझाकिस्तान येथे एशियन चॅम्पियनशिप रंगणार
By रवी दामोदर | Published: October 16, 2023 07:02 PM2023-10-16T19:02:04+5:302023-10-16T19:03:11+5:30
पलक झामरे ही अकोला क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
अकोला : कझाकिस्तान देशातील अस्थाना येथे ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत बॉक्सिंग गटात अकोल्याची पलक झामरे ही देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही बाब जिल्ह्यावासीयांसाठी अभिमानाची असून, बॉक्सिंग क्षेत्रातून तिचे कौतुक होत आहे. सध्या ती पटियाला येथे भारतीय संघासोबत प्रशिक्षण घेत आहे.
पलक झामरे ही अकोला क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. यापूर्वीही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यामध्ये तिने उत्कृष्ट प्रदर्शन करून रजत पदक मिळविले होते. आगामी दिवसात होणाऱ्या ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिमध्ये बॉक्सिंग स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. या स्पर्धेत ती सुवर्ण पदक जिंकेल, अशी आशा बॉक्सिंग क्षेत्रातून होत आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या सदस्यांनी तिचे कौतुक केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्याकडे तिने बॉक्सिंगचे धडे गिरवले आहेत.
आशियातून ठरली होती दुसऱ्या क्रमांकाची बॉक्सर
पलक झामरे हिने यापूर्वीसुद्धा एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये ती रजत पदक प्राप्त करून आशिया खंडात दुसरी बॉक्सरची मानकरी ठरली होती. तसेच तिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. यंदा ती सुवर्ण पदकावर नाव कोरेल, अशी आशा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.