अकोल्यात आढळला भुरकट रंगाचा चिरक पक्षी
By Atul.jaiswal | Published: July 3, 2019 12:07 PM2019-07-03T12:07:42+5:302019-07-03T12:12:23+5:30
अकोला : निसर्गत: काळपट-निळसर रंगाचा असलेला; परंतु रंगसूत्रातील बदलामुळे भुरकट-पांढरट झालेला चिरक पक्षी अकोल्यात आढळून आला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : निसर्गत: काळपट-निळसर रंगाचा असलेला; परंतु रंगसूत्रातील बदलामुळे भुरकट-पांढरट झालेला चिरक पक्षी अकोल्यात आढळून आला आहे. ‘इंडियन रॉबीन’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव असून, त्याचा मूळ रंग काळपट-निळसर असतो. अकोल्यातील पक्षीमिश्र देवेंद्र तेलकर व नीलेश पडघन यांना भुरकट-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी कौलखेड परिसरात २८ जून रोजी आढळून आला आहे. याला पार्शियल अल्बिनिजम इंडियन रॉबीन असेही म्हटल्या जाते.
महाराष्ट्रात सामान्य अधिवासांमध्ये चिरक पक्षी आढळून येतो. हा पक्षी काळपट-निळसर रंगाचा असतो. काळी शेपटी, लालसर बुड, नराच्या खांद्यावर पांढरा डाग, तर अंतर्भाग निळसर असतो. मादीचा अंतर्भाग करडा असतो. गवतावरील लहान-मोठे कीटक व दाणे हे या पक्ष्याचे भक्ष्य आहे. शेताच्या बांधावर, बागेत तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात हा पक्षी आढळून येतो. कौलखेड परिसरात मात्र पांढरा-भुरकट रंगाचा चिरक पक्षी आढळून आला आहे. पक्ष्यांच्या शरीरातील रंगसूत्रांमध्ये बदल झाल्यास त्यांचा रंग बदलू शकतो. चिरक पक्ष्यांमध्येही असे बदल झालेले आढळून येतात. काही दिवसांपूर्वी नागपुरात पांढºया रंगाचा कुट पक्षी, तर अमरावती पांढरा कोतवाल व कावळा आढळून आला होता. याच मालिकेत पांढरा-भुरकट रंगाचा चिरक पक्षी आढळून आला आहे. निसर्गत: काळपट- निळसर रंगाचा हा पक्षी रंगसूत्रातील बदलाने पांढरा-भुरकट झाला असून, ही सामान्य बाब असल्याचे देवेंद्र तेलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.