पैलपाडा ग्रामपंचायतने केली पक्ष्यांच्या दाणा- पाण्याची सोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:09+5:302021-03-22T04:17:09+5:30
सचिन राऊत अकोला- उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच त्यांच्या खाण्याची सोय सुध्दा करण्याचा अभिनव ...
सचिन राऊत
अकोला- उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच त्यांच्या खाण्याची सोय सुध्दा करण्याचा अभिनव उपक्रम पैलपाडा या गावात करण्यात येत आहे. उन्हाळ्याचे चटके सुरू होताच माणसाप्रमाणे प्राणिमात्रांच्या पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्राणी तसेच पक्ष्यांसाठी नागरिक पिण्याच्या पाण्याची सोय करतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही झाडाच्या फांद्यांवर पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. दरम्यान आपल्या गावच्या शिवारात येणाऱ्या पक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्यासोबतच खाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी पैलपाडा ग्रामपंचायतने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. गावातील चौक, रस्त्यावर असलेल्या २० झाडावर पक्ष्यांसाठी पाणी व तांदूळ ठेवण्यात आले आहेत.
तर अंगणात झाड असलेल्या ३० ग्रामस्थांना पक्ष्यांसाठी भांडे व २० किलो तांदूळ देण्यात आले आहेत. हा उपक्रम १८ मार्चपासून सुरु करण्यात आला असून दरवर्षी उन्हाळ्यात राबविल्या जाणार अशी माहिती सरपंच वर्षा गौड..उपसरपंच गणेश मापारी यांनी दिली. उपसरपंच गणेश मापारी, ग्रा. प. सदस्य विनायक गुहे, सुभाष देशमुख तसेच राजेश देशमुख, भीमराव खंडारे, संजय भारसके, रामेश्वर देशमुख, विजय खंडारे, नितीन नागे आदीच्या हस्ते वाटप करण्यात आले.
....
शुद्ध पाण्याचा होणार वापर.
पक्ष्यांना पिण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाणी ठेवण्यात येत आहे. मुख्य चौक व रस्त्यावरील झाडावर नियमित पाणी व तांदूळ ग्रामपंचायत कर्मचारी ठेवणार आहेत.