पणजच्या केळी उत्पादकांना मिळणार पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:38+5:302021-08-18T04:25:38+5:30
अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित ...
अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम अदा करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश आले असून, कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तातडीने आदेश काढून भारतीय कृषी विमा कंपनीने ६५ लाख रुपयांचा विमा पणज मंडळातील शेतकऱ्यांना द्यावा, असे लेखी आदेश काढले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करावी, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चालूवर्षी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांनी २०१५ ते २०२१ यादरम्यान केलेल्या कारभाराची तसेच पत्रव्यवहाराची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी, पीकविमा योजनेची वेबसाईट मराठीत काढावी, मागील पाच वर्षांमधील पीकविमा कंपन्यांचे ऑडिट करावे यांसह विविध मागण्या करीत पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे पाहून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलाविले. तब्बल तीन तास सर्व प्रश्नांवर खलबते झाली. आयुक्तांनी अनेक मुद्यांवर संमती दर्शविली आणि मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे धीरजकुमार यांनी सांगितले. यावेळी मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख उपस्थित होते.
या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, प्रकाशतात्या बालवडकर, अमर कदम, विनातक सरनाईक, विकास देशमुख, अनिल रोकडे, प्रदीप ठाकूर, सचिन पांडुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
(फोटो)
-----------------
विमा कंपनीच्या तत्कालीन जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
भारतीय कृषी विमा कंपनीच्या तत्कालीन अकोला जिल्हा प्रतिनिधीवर अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.