पंचनामे उरकले; पण मदतीचा ‘जीआर’ निघेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:54 AM2019-11-11T10:54:08+5:302019-11-11T10:54:31+5:30
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम काही जिल्ह्यांत आटोपले असून, काही जिल्ह्यांत अंतिम टप्प्यात आहे. पीक नुकसानाचे पंचनामे उरकण्याच्या मार्गावर असले तरी, पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा शासन निर्णय (जीआर) मात्र अद्याप सरकारकडून निघाला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. यासोबतच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, काही जिल्ह्यांत अंतिम टप्प्यात आहे. पीक नुकसानाचे पंचनामे उरकण्याच्या मार्गावर असले तरी, पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा शासन निर्णय (जीआर) अद्याप सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत सरकारकडून केव्हा जाहीर होणार आणि मदतीचा ‘जीआर’ जिल्हाधिकारी कार्यालयांना केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकरी प्रतीक्षेत!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा ‘जीआर’ अद्याप सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा आणि किती मिळणार, याबाबत राज्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.