घरांची पडझड, पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:12 PM2019-09-23T14:12:15+5:302019-09-23T14:12:20+5:30
जिल्हा प्रशासनामार्फत रविवारपासून जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.
अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री धुवाधार पाऊस बरसला असून, तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, पाऊस व पुराच्या तडाख्यात घरांची पडझड आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत रविवारपासून जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. त्यामध्ये बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसल्याने या तीनही तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतात पावसाचे पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीनही खरडून गेली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात घरांची पडझड झाली आहे. त्यानुषंगाने पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांद्वारे नुकसानाचे पंचनामे करण्यात येत असून, नुकसानाचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांकडून नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
अकोला तालुक्यात पाऊस आणि पुरामुळे घरांची पडझड आणि पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.
-डॉ. नीलेश अपार,
उपविभागीय अधिकारी, अकोला.